पालकमंत्र्यांच्या पुढाकारात जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व महिलांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहिम उद्या (21 सप्टेंबर) राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील विशेष मोहिम राबविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने नागपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केवळ महिलांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ महाविकास आघाडी सरकारच्या अभियानाचा एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यात ही मोहिम राबविली जात आहे. नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रांवर 21 सप्टेंबरला केवळ महिलांचे लसीकरण होणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण होण्याचे प्रमाण कमी असल्याने तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर कोरोनाचा विशेष प्रभाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 330 लसीकरण केंद्रांवर ही मोहिम राबविली जाणार आहे. यात नागपूर शहरातील 166 लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण 34 लाख 48 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले आहेत. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 24 लाख 83 हजार तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 9 लाख 64 हजार एवढी आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 16 लाख 43 हजार महिलांचे लसीकरण झालेले आहे तर 18 लाख 3 हजार पुरुषांचे लसीकरण झालेले आहे.
नागपूर शहरात 19 सप्टेंबरपर्यंत 19 लाख 11 हजार लोकांचे लसीकरण झालेले आहेत. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 13 लक्ष 13 हजार तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5 लक्ष 97 हजार एवढी आहे. नागपूर शहरात ही विशेष मोहिम राबविण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. विशेष प्रयत्न करीत आहेत. नागपूर शहरातील महिलांनी या मोहिमेचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा, असे आवाहन राधाकृष्णन बी यांनी केले आहे.
नागपूर ग्रामीण भागातील महिलांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी प्रशासन यंत्रणेचा आढावा घेतला. नागपूर ग्रामीण भागात 19 सप्टेंबरपर्यंत एकूण लसीकरण झालेले आहेत. तालुका निहाय भिवापूर- 58 हजार 506, हिंगणा- 1 लक्ष 56 हजार 432, कळमेश्वर- 99 हजार 955, कामठी- 1 लक्ष 50 हजार 97, काटोल- 1 लक्ष 7 हजार 156, कुही- 65 हजार 694, मौदा- 87 हजार 607, नागपूर ग्रामीण- 1 लक्ष 65 हजार 576, नरखेड- 96 हजार 7, पारशिवनी 91 हजार 742, रामटेक- 76 हजार 621 सावनेर- 1 लक्ष 51 हजार 206, उमरेड- 1 लक्ष 39 हजार 911 एकूण 14 लक्ष 46 हजार 510 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
पालकमंत्र्यांचे आवाहन
नागपूर जिल्ह्यातील महिलांचे लसीकरण करून संपूर्ण कुटुंब सुरक्षित करण्यासाठी ही मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने महिलांना लसीकरण केंद्रांपर्यंत आणण्यासाठी मदत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.