पट्टे वाटपाच्या प्रलंबित विषयावर विशेष बैठक
नागपूर : नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या हक्काचे मालकी हक्क पट्टे लवकरात लवकर मिळावे याकरिता या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. शहरातील पट्टे वाटपाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महापौरांनी गुरूवारी (ता.४) मनपामध्ये विशेष बैठक घेतली.
मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांच्यासह प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक संचालक नगररचना हर्षल गेडाम, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, जितेंद्र तोमर, लीना बुधे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी शहरातील झोपडपट्ट्यांनी माहिती दिली. शहरातील अतिक्रमणित झोपडपट्ट्यांतर्गत पट्टे वाटप करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये हे सर्वेक्षणकार्य थांबलेले होते. आता पुन्हा नव्याने सुरू झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर शहरात एकूण ४२६ अतिक्रमित झोपडपट्टयांची नोंद आहे. यापैकी अधिसूचित असलेल्या २९९ झोपड्या व १२७ अधिसूचित नसलेल्या झोपडपट्टी आहेत. यापैकी नागपूर महानगरपालिकेच्या जागेवर १६, नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर ५५, महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ८४, रेल्वेच्या जागेवर ११, खाजगी मालकीच्या जागेवर ८२, मिश्र मालकिच्या जागेवर १५१, इतर शासकीय जागेवर ९, आबादी ९ व झुडपी जंगल क्षेत्रात ९ अशा एकूण ४२६ झोपडपट्ट्या आहेत, अशीही माहिती उपायुक्तांनी दिली.
नागपूर शहरामध्ये महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, राज्य शासन, रेल्वे, खाजगी, नझुल व अन्य ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्टी वासीयांना त्यांच्या हक्काचे मालकी पट्टे देण्यासाठी आधी संपूर्ण प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने या सर्व झोपडट्ट्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी मनपा, नासुप्र यासह इतर सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. नागरिकांच्या सुविधेसाठी सर्वांनी एकत्रितरित्या योग्य समन्वय साधून कार्य करावे व नागरिकांच्या मालकी हक्क पट्ट्यांच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले. तसेच खाजगी जागेतील झोपडपट्टीवासियांना मालिकी हक्काचे पट्टे बददल प्रक्रिया तत्काल करण्याचेही निर्देश दिले.
शहरातील बहुतांशी क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून शोभाखेत, भोईपूरा, नयापूर, खदानवस्ती, बजेरीया, भालदारपूरा, बारसेनगर, नारा, मातंगपूरा आधी भागामध्ये सर्वेक्षणचे कार्य सुरू असल्याची माहिती यावेळी लीना बुधे यांनी दिली. सर्वेक्षण कार्यामध्ये कुठलीही अडचण किंवा अडथळे निर्माण झाल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.