बीओटी, पीपीपी कामांचा घेतला आढावा
नागपूर : प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या तसेच बीओटी आणि पीपीपी तत्वावर केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्तावित असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या बीओटी व पीपीपी तत्वावर असलेल्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्तावित असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्प विशेष समितीची बैठक बुधवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली.
यावेळी माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय विशेष समिती सभापती पिंटू झलके, उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, सहायक आयुक्त विजय हुमने, स्मिता काळे, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, नगररचना विभागाचे श्री. पिंपळकर, नागपूर सुधार प्रन्यासचे श्री.बापट प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर प्रवीण दटके यांनी ऑरेंज सिटी प्रकल्प, बुधवार बाजार महाल व सक्करदरा, नागपूर मेट्रो रेल्वेशी संबंधित असलेले प्रकल्प, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट या प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला.
गांधीबाग झोनमधील महाल दवाखाना, भंडारा रोड, केळीबाग रोड, रामजी पहेलवान रोड याची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा माजी महापौर प्रवीण दटके यांनी घेतला. डिक दवाखाना विकसित करणे व अद्ययावत करणे हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असेही प्रवीण दटके यांनी सांगितले. १५ डिसेंबर २०१८ रोजी मेट्रो रेल्वे व हबीज यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.