नागपूर: * ताशी २५ किमी वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी ९० किमी वेगाने धावायला तयार असेल. आगामी काळात ताशी ९० किमी वेगाने महा मेट्रो नागपूरचे ट्रायल रन होणार आहे. ट्रायल रन पूर्वीच्या तयारीचे परीक्षण करण्यासाठी आज बुधवार, १२ सप्टेंबर रोजी ‘आरडीएसओ’ने (रेल्वे डिझाईन सुरक्षा ऑर्गनायझेश) नागपूरचा दौरा केला. ताशी ९० किमी वेगाने धावण्याच्या तयारी संबंधीचा आढावा घेण्यासाठी ‘आरडीएसओ’चा हा दौरा आयोजित होता. ‘आरडीएसओ’च्या उच्च स्तरीय चमूने संपूर्ण दिवस नागपूर मेट्रोचे व इतर संबंधित बाबींचे परीक्षण केले. एच के रघु यांच्या नेतृत्वात ‘आरडीएसओ’चे नागपुरात आगमन झाल्यानंतर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती ‘आरडीएसओ’च्या अधिकाऱ्यांना दिली. ‘आरडीएसओ’तर्फे एच के रघु, कार्यकारी संचालक (शहरी वाहतूक व उच्च गति). कमलेश कुमार, संचालक (बांधकाम) आणि नमन कुमार, उपसंचालक (यांत्रिक) या दौऱ्यात उपस्थित होते.
आरडीएसओ’ने प्रथम एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनचे निरीक्षण करून तेथील सुविधांची तपासणी केली. यानंतर ‘आरडीएसओ’ अधिकाऱ्यांनी मिहान मेन्टेनन्स डेपोसह एयर पोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन व खापरी मेट्रो स्टेशनला भेट दिली. न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनचे निरीक्षण करून दोन्ही स्टेशनवरील सुविधांची तपासणी केली. यासह ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) व खापरी येथील स्टेशन कंट्रोल रूम तसेच मिहान कार डेपोमधील सोयींचा आढावा घेत अपघातग्रस्त परिस्थितीत प्रवासी सुरक्षेशी संबंधित उपायांवर परीक्षण करून इतर यंत्रणांची पाहणी केली. महा मेट्रोच्या शंटर, हायड्रॉलिक जॅक आणि इतर बचाव उपकरणांचे निरीक्षण देखील ‘आरडीएसओ’ने केले.
मेट्रो मेट्रो अधिकाऱ्यांनी ‘आरडीएसओ’ अधिकाऱ्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. प्रोजेक्टची प्रगती व इतर संबंधित तपशीलांची सविस्तर माहिती सिव्हिल लाईन्सच्या मेट्रो हाउसमध्ये देण्यात आली.संपूर्ण दिवस मेट्रो आणि संबंधित बाबींचे परीक्षण झाल्यानंतर ‘आरडीएसओ’ने यावर समाधान व्यक्त केले. यावेळी महा मेट्रोचे वरिष्ठ महाप्रबंधकांमध्ये जनक कुमार गर्ग. ईडी (रोलिंग अँड स्टॉक). नरेश गुरबानी, सीपीएम (ट्रॅक). आलोक कुमार सहाय, सीपीएम (ट्रॅक्शन). जय सिंग, सीपीएम (सिग्नल). यांच्यासह महा मेट्रोचे इतर अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.