नागपूर: शनिवारी ७ सप्टेंबरला श्री गणेशाची स्थापना होणार आहे. याआधीपासूनच शहरातील विविध भागात स्थापन करण्यात येणा-या मोठमोठ्या गणेशमूर्ती नेण्यात येतात. याशिवाय श्री गणरायाच्या आगमनानिमित्त मिरवणूक देखील काढली जाते. नागपूर शहरातील श्री गणेशाच्या सर्व मिरवणुकीच्या मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे हॉट मिक्स प्लान्ट विभागाद्वारे इंस्टा पॅचरच्या व हॉट मिक्स प्लान्टच्या सहकार्याने आतापर्यंत रस्त्यावर २५६३४ चौरस मीटर जागेवरील २६५४ खड्डे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती हॉट मिक्स प्लाँट विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजय डहाके यांनी दिली. त्यांनी सांगितले की, जेट पॅचर, इंस्टा पॅचरच्या सहायाने व हॉट मिक्स प्लॉंटतर्फे सर्व झोननिहाय खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.
गणरायाच्या आगमन मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्राथमिकता देण्यात आली आहे. इंस्टा पॅचर, जेट पॅचर व हॉट मिक्स प्लॉन्ट तर्फे आतापर्यंत २५६३४ चौरस मीटर क्षेत्रातील २६५४ खड्डे बुजविण्यात आली आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधील २४८, धरमपेठ झोनमधील ५२८, हनुमान नगर झोनमधील १०४, धंतोली झोनमधील २७७, नेहरूनगर झोनमधील २२३, गांधीबाग झोनमधील २१९, संतरजीपुरा झोनमधील २८३, लकडगंज झोनमधील २८२, आशीनगर झोनमधील २३० आणि मंगळवारी झोनमधील २६० खड्डे बुजविण्यात आले आहेत. श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी शहरातील जास्तीत जास्त मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला गती देण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले आहेत.