नागपूर :काळ बदलतो तश्या मागण्या बदलत जातात. सध्याच्या काळात जाहिरात हे सर्वात प्रमुख क्षेत्र आहे. जाहिरातीची भाषा म्हणून हल्ली मराठी भाषेचा वापर फार कमी होत चालला असल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने नागपूर महानगर पालिकेकडून जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च केल्या जातो.
मात्र नुकतेच सोशल मीडियावर रिल म्हणून टाकलेल्या एका जाहिरातीवरून मनपावर सर्व स्तरावरून टीकेची झोड उठली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नागपूरकर चांगलेच संतापल्याचे दिसते.
नागपुरात वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. यावर जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेने हिंदी भाषेत रिल तयार करत कचरा न जाळण्याचे नागरिकांना आवाहन केले. मात्र आम्ही महाराष्ट्रात राहतो. आमची मातृभाषा मराठी असून जाहिरात मराठीत का दिली नाही. तुम्हाला मराठी भाषेची लाज वाटते का ? अशा प्रश्नांची सरबत्ती नागपूरकरांनी केली आहे.
नागपूर टुडे’च्या टीमने यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
आता नागपूर महानगर पालिका प्रशासनाकडून यावर काय प्रतिक्रीया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी –
आपली भाषा ही फक्त संवादाचे साधन नसते, तर ती असते आपला श्वास आणि जगण्याचा ध्यास. आपण स्वप्ने मायबोलीतच पाहातो. जाहिरातीची भाषा म्हणून मराठी आपण वापरत नाही. यामुळे मराठी भाषेचे महत्त्व कमी होताना दिसत आहे.
जर सर्व मराठी माणसे अडून बसली की मराठीतच सेवा सुविधा हव्यात तर सर्वांना त्या द्याव्याच लागतील. दुर्दैवाने आपण इंग्रजी किंवा हिंदीत चालवून घेतो. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरणे गरजेचे आहे.