नागपूर : खेळामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेसोबतच बुध्दीमतेत वाढ होते. महिला व बालविकास विभागाच्या अनाथ व निराधार मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी झाल्याने निश्चित त्यांच्या शारीरिक क्षमतेत व बुध्दीमतेत वाढ होईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. या मुलांसाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. पोलीसांबद्दल मनात असलेली भिती काढून टाका. पोलीस आपले मित्र आहेत ही जाणीव ठेवून खुप शिका व आयपीएस व आयएएस अधिकारी बना, असा सल्ला त्यांनी दिला.
नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे आयोजित चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम,महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, सामाजिक कार्यकर्त्या शालीनी छाबडीया, संचालक हॉटेल मॅनेजमेंटचे प्रदीप पाली, सौमित्र बोस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुऱ्हे आदी उपस्थित होते.
मुलांनी आपला सर्वांगिण विकास करण्यासाठी कठोर मेहनत करावी. त्यामुळे आपले भविष्य निश्चितच उजळणार आहे. खोटे बोलू नये. नेहमी मोठ्या मंडळींचा सल्ला घ्या. खिलाडूवृत्ती बाळगा. त्यासोबतच मुलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जीवनाची सुरुवात योग्य रितीने झाली तर भविष्य उज्ज्वल आहे, असे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुऱ्हे यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात एकूण 350 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही सर्व मुले व मुली शासकीय बालगृह, स्वयंसेवी संस्थांचे बालगृह त्याचप्रमाणे महिला वसतिगृहातील लाभार्थी सहभागी आहेत. यात धावणे, खो-खो, कबड्डी, लांब उडी, गोळाफेक व व्हॉलीबाल क्रीडा स्पर्धांसह कॅरम,चेस, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांच्या प्रोत्साहनासाठी शालेय विद्यार्थ्यांनी कराटे डेमोचे सादरीकरण केले.
समारोपीय कार्यक्रमात एकूण 268 पुरस्कार व स्मृतीचिन्हे बालकांना प्रदान करण्यात आली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.