क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी दिला विश्वास
नागपू : नागपुरातून विविध क्रीडा प्रकारासाठी खेळाडू तयार व्हावे, त्यासाठी नागपुरात तशा सुविधा खेळाडूंना पुरविण्याच्या दृष्टीने आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने लवकरच नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा धोरण तयार होणार आहे. या धोरणाचे प्रारूप तयार झाले असून त्यात शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल. यासाठी पाच ते सहा सदस्यांची एक समिती तयार करून प्रत्येक आठवड्यात त्यावर विचारविनिमय करण्यात येईल. क्रीडा पदाधिकाऱ्यांच्या सूचना आणि सहभागानेच क्रीडा धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असा विश्वास मनपाचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी दिला.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित क्रीडा धोरणाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनपाच्या क्रीडा विशेष समितीच्या बैठकीचे आयोजन मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सोमवारी (ता. ५) करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. सभापती प्रमोद तभाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला उपसभापती लखन येरावार, सदस्य रूपाली ठाकूर, शेषराव गोतमारे, अमर बागडे, नरेंद्र वालदे, छत्रपती अवॉर्ड विजेते विजय मुनिश्वर, डॉ.शरद सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहरातून प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम खेळाडू तयार करण्यासाठी आणि त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक क्रीडा धोरण आवश्यक आहे. जेणेकरून शहरातील खेळाडूंसाठी एक चांगले वातावरण तयार होऊन त्यांनी कुठल्याही खेळप्रकारात पुढे जाण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळेल. ह्याच हेतूने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात क्रीडा धोरणाला मंजुरी मिळावी, यादृष्टीने क्रीडा धोरण तयार करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना असल्याशिवाय ते पूर्ण होऊच शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे योगदान यात महत्त्वाचे असल्याचे सभापती प्रमोद तभाने यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी उपस्थित सदस्यांना क्रीडा धोरण तयार करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याची गरज विषद केली. धोरणाच्या प्रारूपात सदस्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर प्रत्येक आठवड्यात त्यावर चर्चा व्हावी आणि दोन महिन्यानंतर पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यावर चर्चा करून अंतिम स्वरूप द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी क्रीडा धोरणात समावेश करण्यासाठी अनेक सूचना मांडल्या. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात नागपूरच्या खेळाडूंची निवड व्हावी, त्याने पदक मिळवावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच अधिकाधिक क्रीडा प्रकारात खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे प्रयत्न होण्याची गरज आहे.
‘प्रोजेक्ट ऑलिम्पिक’ आणि ‘स्पोर्टस् फॉर ऑल’ असे विशेष कार्यक्रम राबविण्यात यावे. शहरात परिसरनिहाय फिटनेस केंद्र तयार व्हावे, महापौर चषक अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, स्वरक्षणाचे धडे प्रत्येक शाळांतून देण्यात यावे, निव्वळ खेळासाठी समर्पित असे एक केंद्र शहरात असावे, कुठल्याही मैदानावर कुण्या संघटनेची मक्तेदारी नसावी, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्केटिंग रिंक तयार करण्यात याव्या, खासगी क्लबमध्ये मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात यावे, विद्यार्थ्यांना मोफत ज्युदो, कराटेचे प्रशिक्षण देण्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहाराची व्यवस्था करावी, छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना मनपाने नोकरी द्यावी, मनपा शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रत्येक क्रीडा प्रकाराविषयी माहिती द्यावी, क्रीडा संघटनांवर मनपाचा अंकुश असावा, खेळाडूंचा आरोग्य विमा असावा, क्रीडा धोरणाचा कालावधी १० वर्षांपेक्षा अधिक असावा, मनपाचे क्रीडा संकुल असावे ज्यात किमान १० खेळ खेळता यावे, खेळासाठी निधी उभारण्याचे दृष्टीने मनपाने शहरातील नागरिकांकडून सेस वसूल करावा, इनडोअर खेळांसाठी व्यवस्था करावी अशा अनेक सूचनांचा यात समावेश होता.
बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. विवेक अवसरे, गणेश कोहळे, हरिश वोरा, अजय सोनटक्के, डॉ. उपेंद्र वर्मा, प्रा. सुधीर निंबाळकर, प्रशांत जगताप, पुरुषोत्तम चौधरी, मुकुंद डांगे, मोहम्मद शोहेब, विजय नायडू, डॉ. सुधीर भिवापूरकर, सचिन देशमुख, डॉ. पद्माकर चारमोडे, अशफाक शेख, प्रवीण मानवटकर, डॉ. दीपक कविश्वर, क्रीडा संचालक डॉ. सूरज येवतीकर, डॉ. विजय दातारकर, डॉ. सुरेंद्र तिवारी, प्रदीप केचे आदींचा समावेश होता.