क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांचे नगरसेवकांना आवाहन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा धोरण आखण्यात येत असून यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या वतीने क्रीडा धोरण समिती गठीत करण्यात आली आहे. शहरातील क्रीडा विषयक विकासासाठी आपला सहभाग आवश्यक असून सर्वांनी याबाबत सूचना द्यावे, असे आवाहन क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी केले.
विविध विषयांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.२९) क्रीडा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. क्रीडा समिती सभापतींच्या कक्षात आयोजित बैठकीत उपमहापौर व समितीच्या उपसभापती मनिषा कोठे, सभापती प्रमोद चिखले, सदस्य सुनील हिरणवार, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, सदस्या वंदना चांदेकर, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
बैठकीत क्रीडा विभागाचे वार्षिक सर्वसमावेशक कॅलेंडर तयार करणे, सन २०१९-२० मध्ये आयोजित होणा-या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, २०१९-२० च्या मनपा अर्थसंकल्पात क्रीडा विभागाकरीता केलेल्या तरतुदी, विभागाच्या अनुषंगाने प्राप्त होणारे प्रत्येक प्रस्ताव क्रीडा समिती सभापतींकडे सदर करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
मनपा क्रीडा विभागातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासंबंधी विभागाच्या वतीने वार्षिक सर्वसमावेशक कॅलेंडर तयार केले जाते. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये बहुतांशी स्पर्धांचे आयोजन होणार आहे, मात्र काही स्पर्धांच्या तारखांची निश्चीती न झाल्याने सद्या कॅलेंडर तयार होउ शकणार नाही. त्यामुळे याबाबत आवश्यक पाठपुरावा करुन लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी दिले.
बालकदिन व शिक्षण सप्ताहानिमित्त १३ ते २३ डिसेंबरदरम्यान विविध स्पर्धा
बालकदिन व शिक्षण सप्ताहानिमित्त मनपा क्रीडा विभागाच्या वतीने येत्या १३ ते २३ डिसेंबर दरम्यान झोन व केंद्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १० दिवस मैदानी स्पर्धा, बुद्घीबळ, फुटबॉल, लंगडी, कबड्डी, रस्साखेच, नाटक व नृत्य स्पर्धा होणार आहेत.
झोनस्तरीय स्पर्धा
झोनस्तरावरील स्पर्धांमध्ये १३ डिसेंबरला नाटक व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. नाटक व नृत्य स्पर्धा दोन झोन मिळून एका ठिकाणी होतील. लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनस्तरावरील स्पर्धा बॅरीस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, हनुमाननगर व धंतोली झोन स्तरावरील स्पर्धा लाल बहादुर शास्त्री माध्यमिक शाळा, नेहरूनगर व लकडगंज झोन स्तरावरील स्पर्धा डॉ.राम मनोहर लोहिया माध्यमिक शाळा, गांधीबाग व सतरंजीपुरा झोन स्तरावरील स्पर्धा साने गुरूजी उर्दू माध्यमिक शाळा, आसीनगर व मंगळवारी झोन स्तरावरील स्पर्धा एम.ए.के.आझाद उर्दू माध्यमिक शाळा येथे होणार आहेत. सर्व स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरू होतील.
१६ डिसेंबरला झोनस्तरावरील मैदानी व बुद्धीबळ स्पर्धा, १७ डिसेंबरला फुटबॉल व लंगडी स्पर्धा, १८ डिसेंबरला कबड्डी व रस्साखेच स्पर्धा होतील. सर्व स्पर्धा दोन झोन मिळून एका ठिकाणी होणार आहेत. लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनस्तरावरील स्पर्धा विवेकानंद नगर माध्यमिक शाळा, हनुमाननगर व धंतोली झोन स्तरावरील स्पर्धा दुर्गानगर माध्यमिक शाळा, नेहरूनगर व लकडगंज झोन स्तरावरील स्पर्धा डॉ.राम मनोहर लोहिया माध्यमिक शाळा, गांधीबाग व सतरंजीपुरा झोन स्तरावरील स्पर्धा नवी शुक्रवारी हिंदी माध्यमिक शाळा, आसीनगर व मंगळवारी झोन स्तरावरील स्पर्धा एम.ए.के.आझाद उर्दू माध्यमिक शाळा येथे होणार आहेत. सर्व स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरू होतील.
केंद्रीय स्तरावरील स्पर्धा दुर्गानगर माध्यमिक शाळेमध्ये
केंद्रीय स्तरावरील नाटक, नृत्य व बुद्धीबळ स्पर्धा १४ डिसेंबरला, मैदानी स्पर्धा (१०० मीटर दौड, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक) १९ डिसेंबरला, सांघिक स्पर्धा (कबड्डी, लंगडी, रस्साखेच, फुटबॉल) २० डिसेंबरला होतील. सर्व स्पर्धा दुर्गानगर माध्यमिक शाळा, मानेवाडा रोड येथे सकाळी ९ वाजतापासून सुरू होतील.
सर्व स्पर्धांचा समारोपीय कार्यक्रम २३ डिसेंबरला सकाळी १० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.