दुबई : चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजवणारी सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. तर दुसरी मुलगी जान्हवी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली. तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ‘ज्यूली’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘सोलावा सावन’ (१९७८) साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका साकारत मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हिंमतवाला’, ‘मवाली’, ‘मास्टरजी’, ‘मकसद’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’, ‘चालबाज’ ‘खुदा गवाह’ आदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले. श्रीदेवी यांनी ‘सदमा’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात कायम आहे.
निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘जुदाई’ चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.