नागपूर : ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील दोषींना १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. ट्रक चालकांच्या संपाचा फटका एसटीलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नववर्षाची सुरुवात आंदोलनाने झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ट्रक चालकांच्या संपात ऑइल टँकर चालकही सहभागी झाले. नागपूर जिल्ह्यातील १६३ पंपांवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पेट्रोल आणि डिझेल पोहोचले नाही.
त्यामुळे मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विदर्भात आंदोलन चिघळले असून विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.