नागपूर: जलप्रदूषण टाळण्यासाठी तलावात श्रीगणेशाचे विसर्जन न करता कृत्रिम टँक आणि कृत्रिम तलावात विसर्जन करावे, या हेतूने घरगुती गणेश विसर्जनासाठी दहाही झोन मिळून कृत्रिम टँक खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी (ता. १७) मंजुरी दिली आहे.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सोमवारी (ता. १७) स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य, उपायुक्त व अन्य विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
सदर कृत्रिम टँक खरेदीसाठी ४ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. झोनकडून आलेल्या मागणीनुसार १२ फूट रुंद आणि ३० इंच जाडीच्या व १५ फूट रुंद आणि ३६ इंच जाडीच्या टँक खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी निविदेतील प्राप्त मंजूर दरानुसार दोन्ही प्रकारच्या टँकवर अनुक्रमे १८ लाख ७९ हजार ९०० रुपये आणि २२ लाख ३६ हजार ८०० रुपये असे एकूण ४१ लाख १६ हजार ७०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च जिल्हा नियोजन समितीकडून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी देत कृत्रिम टँक खरेदीचा मार्ग मोकळा केला.
प्रभाग क्र. ११ अ बाबा फरीदनगर येथील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण आणि पावसाळी नाली टाकण्याच्या ६० लाख ९८ हजार ५४६ रुपयांच्या कामाच्या निविदेपैकी आर. एम. गोपलानी यांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रभाग क्र. १२ ड येथील आकार नगर, जागृती कॉलनी, वास्तुशिल्प रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाकरिता मे. एल.सी. गुरुबक्षानी यांच्या ३६ लाख ७१ हजार ३९७ रुपये खर्चाच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली.
नागपूर शहरातील नागरिकांना १२५ लिटर प्रति दिन क्षमतेचे सोलर वॉटर हिटर ५० टक्के सबसिडीसह पुरवठा करून कार्यान्वयन करणे या कामाकिरता मे. रिड्रेन एनर्जी प्रा. लि.राजकोट, मे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव, मे. एम. एम. सोलर प्रा. लि. नागपूर यांना अनुक्रमे १८९८ नग, ७९३ नग, ७५९ नगर यानुसार कामाची विभागणी करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी यासंदर्भात कार्यादेश झाला होता.
सहा महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम द्यायचे होते. मात्र, मे. रिड्रेन एनर्जी प्रा. लि. राजकोट या कंपनीने एकूण १११४ सोलर वॉटर हिटर्सचे काम केल्यानंतर मार्च २०१७ मध्ये देण्यात आलेल्या १७८ सोलर वॉटर हिटर्सचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण केले नाही. नागरिकांनी मनपाकडे दिलेल्या डिमांड ड्राफ्टची मुदत संपल्याने ते रद्द झाले. यामुळे सदर काम मे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव आणि मे. एम. एम. सोलर प्रा.लि. नागपूर यांच्याकडून करवून घेण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयाला स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ६३ प्रमाणे महानगरपालिकेची आवश्यक कर्तव्ये या बाबी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या अधीन प्रशासनाने या आर्थिक वर्षात किती कामे सुरू केली व केली नसल्यास त्यांची कारणमिमांसा करण्याचा विषय बैठकीत चर्चेला आला. हा विषय स्थगीत ठेवण्यात आला. महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ९३ व ९४ अन्वये स्थायी समितीने विहीत केलेल्या नमुन्यामध्ये लेख ठेवणे व प्रशासकीय अहवाल आणि लेखा विवरणपत्रे तयार करून स्थायी समितीला सादर करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश देत हा विषय स्थगित ठेवण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १०५ (१) व (२) व १०६ नगरपालिका मुख्या लेखा परिक्षकाने लेख्यांची साप्ताहिक छानणी करणे व त्यासंबंधीचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यास हवा हा बैठकीत आलेला विषयही स्थगीत ठेवण्यात आला.