नागपूर: मार्च महिन्यापर्यंत करवसुलीचे उद्दिष्ट गाठता यावे. १०० टक्के वसुली व्हावी यासाठी स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे हे मागील तीन दिवसांपासून झोननिहाय आढावा बैठक घेत आहेत. याअंतर्गत बुधवारी (ता. २४) धंतोली आणि हनुमाननगर झोन येथे आढावा बैठक घेण्यात आली.
स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे, बाजार अधीक्षक दिनकर उमरेडकर, प्रफुल्ल फरकासे यांच्यासह धंतोली झोन बैठकीला झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका लता काडगाये, सहायक आयुक्त गणेश राठोड तर हनुमानगर झोन येथील बैठकीत झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका शीतल कामडी, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते.
सभापती संदीप जाधव यांनी यावेळी करवसुलीचा आढावा घेतला. झोन स्तरावरील अडचणी समजून घेतल्या. सर्व अडचणींवर मात करून यावेळी करवसुलीचे उद्दिष्ट पूर्णपणे गाठायचे आहे. त्यासाठी पुढील दोन महिने बाकीचे सर्व बाजूला ठेवून करवसुलीवर भर द्या, असे ते म्हणाले.
यावेळी कर वसुली निरीक्षकांनी सभापतींसमोर आतापर्यंत झालेल्या वसुलीचा, लिलाव आणि जप्तीचा गोषवारा मांडला. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत करवसुलीचे उद्दिष्ट आपण गाठणार असल्याचे आश्वासन झोनस्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिले.