नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही खरेदी करण्यात यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील जिनीग प्रेसिंग मालकांची बैठक घेऊन कापूस खरेदीबाबत आवश्यक सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राबविण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी केंद्रे बंद होती. परंतू केंद्र शसनाने 15 एप्रिलपासून कापसाची हमी भावाने पुन्हा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी. जिल्ह्यात केंद्रीय कापूस खरेदी निगम (सीसीएय), महाराष्ट्राचे सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, खासगी बाजार व थेट पणन खरेदीदार त्यांच्यामार्फेत खरेदी करण्यात येणार आहे.
कापसाची खरेदी करतांना जिनींग प्रेसिंग परिसरात कापूस खरेदी व प्रक्रियेच्या कामकाजासाठी सेवक आणि मजूर यांची उपस्थित आवश्यक असल्याने त्या संदर्भात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात यावे. एका दिवशी कमाल 20 वाहने किंवा बाजार समितीच्या क्षमतेनुसार येण्याजाण्यासाठी वाहनांना पास देण्यात यावे. हमी भावाने कापसाची खरेदी करणे बंधनकारक असून खासगी व्यापाऱ्यांना कोरोनासंदर्भात दिलेल्या सुधारित नियमानुसार अधिन राहून कापूस खरेदी करण्यात यावी.
कापसावरील प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत व जिल्हाबाह्य सरकी – गाठीची वाहतूक करावयाची असल्यास परवानगी आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे बंधनकारक आहे असे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.