नागपूर : नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना पत्र लिहून महत्त्वाची विनंती केली आहे.
नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची औपचारिक विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूर यांनी या बद्दल पाठपुरावा केल्यानंतर गडकरी यांनी ही मागणी उचलून धरली.
धावपट्टीच्या रिकारपेंटिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता २४ x ७ कार्यरत झाले आहे. या विकासाच्या पार्श्वभूमीवर, नागपूरहून या प्रमुख आग्नेय (साऊथ -ईस्ट) आशियाई केंद्रांसाठी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे यावर असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी भर दिला.
ही मागणी नवीन नसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये दिल्ली येथे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी एआयडीच्या प्रतिनिधींनी नागपूरहून थेट विमानसेवा सुरू करण्याच्या गरजेवर भर दिला होता. तथापि, त्यावेळी धावपट्टीच्या पुनर्बांधणीचे काम प्रलंबित होते आणि उड्डाणांवर निर्बंध होते. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे.