कार्यवाही संदर्भात विविध विभागांची आढावा बैठक
नागपूर : शहरातील अंबाझरी तलावाच्या बळकटीकरण आणि मजबुतीकरण संदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर कार्य सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासंदर्भात कार्यबाबत मनपा आयुक्तांनी बुधवारी (ता.१३) संबंधित विभागांकडून कार्यवाहीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, नागपूर पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) मुख्य अभियंता श्री. पवार, उपायुक्त रवींद्र भेलावे, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मनपाचे उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत नागपूर पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) मुख्य अभियंता श्री. पवार यांनी विभागाद्वारे अंबाझरी ओव्हरफ्लोवर निर्माण करावयाचे दरवाजे तसेच तलाव बळकटीकरणासाठी आवश्यक बदलांबाबत सादरीकरणातून माहिती दिली. यासंदर्भात काही सूचना नोंदवून आयुक्तांनी सदर दरवाज्यांचे सुधारित डिझाईन मंजूर करून प्रस्तावित निधीचे निविदा काढणे तसेच लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत निर्देशित केले. कुठल्याही परिस्थितीत काम थांबू अशी सूचना देखील आयुक्तांनी पाटबंधारे विभागाला केली. सदर कामासाठी आवश्यक निधीची पूर्तता मनपाद्वारे केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या कामासाठी आवश्यक निधीचा राज्य शासनाला प्रस्ताव देण्यात आलेला असून सदर निधी संदर्भात आढावा घेण्याचे देखील मनपाच्या अधिका-यांना निर्देश दिले.
अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणाबाबत ओव्हरफ्लोवर दरवाजे निर्माण करण्यात येणार असून या कामासाठी तलावातील पाण्याची पातळी कमी करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.
डॉ. बॅनर्जी यांनी तलावातील पाणी तांत्रिकदृष्ट्या पाईप लाईनद्वारे नाग नदीच्या प्रवाहात सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली. अंबाझरी ओव्हरफ्लो जवळील पुलासंदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करावयाच्या बदलासंदर्भात सूचना नोंदविण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाटबंधारे विभागाला दिले. याशिवाय तलावाच्या प्रवाहानजीक असलेल्या विविध यंत्रणांना करावयाच्या बदलांची देखील माहिती देण्याचे आयुक्तांनी नमूद केले.
अंबाझरी तलावातून पाण्याचा होत असलेला निचरा यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अभ्यास करून त्याचा अहवाल आणि करावयाच्या उपाययोजनांचा अहवाल मनपाला सादर करावा. तसेच महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यापैकी ज्या प्राधिकरणाच्या अख्यत्यारित सदर विषय येत असेल त्यांना माहिती देउन त्यांच्याकडून कार्यवाही करुन घेण्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केले.