नागपूर/मुंबई : राज्यातील पत्रकारांना स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना (पेन्शन) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी सरकारने 15 कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या तब्बल 20 वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे देशमुख म्हणाले.
मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्या नंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 29 जून रोजी मंत्रालयात बैठ घेतली होती. या बैठकीस वित्त विभागाचे अधिकारी आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुनगंटीवार यांनी मुख्य सचिव यु. एस. मदान यांना फोन करून पत्रकार सन्मान योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 15 कोटी रूपायांची तरतूद करा, असा आदेश दिला. त्यानुसार माहिती आणि जनसंपर्क विभागाने दुसर्या दिवशी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला.
पेन्शन योजना 2005 पासून बंद केली गेली असल्याने पत्रकारांना पेन्शन देता येणार नाही. पत्रकार हे खासगी कर्मचारी असल्याने त्यांना पेन्शन देता येणार नाही असे सांगत वित्त विभागाने ही फाईल सामांन्य प्रशासन विभागाकडे परत पाठविली होती.