मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज गुरुवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांची ४ हजार ८४९ एकर जमीन परत करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महामंडळांबाबत घेण्यात आले ‘हे’ निर्णय?
राज्यातील सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय सुद्धा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे ‘इज ऑफ लिव्हिंग’चा उद्देश साध्य होणार आहे, शिवाय सर्व समाजघटकांना एकाच ठिकाणी सर्व योजना आणि त्याचे लाभ घेता येणार आहेत.
याचे प्रारूप निश्चित करण्यासाठी सुद्धा ४ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. यात नगरविकास-१ चे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, ग्रामविकास सचिव विजय वाघमारे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा समावेश आहे. यांनाही राज्य मंत्रिमंडळाला आपला अहवाल सादर करायचा आहे.