बुलडाणा : राज्य शासन बळीराजाच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी करण्यासाठी शासन अभियान राबविण्यात येत आहे. कर्जमाफी, गटशेती, ठिबक सिंचन, थेट लाभ हस्तांतरण, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना राज्य शासनाने अमलात आणल्या आहेत. अशा प्रकारे राज्य शासन शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तत्पर आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी समद्ध होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर बुलडाणा जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, जि.प अध्यक्ष श्रीमती उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान व आधुनिकीकरण उपयोगात आणणारे शेतकरी राज्यात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच पारंपरिक पद्धतीने शेती करणारा मोठा वर्ग राज्यात आहे. या वर्गाला आधुनिक शेतीचे धडे गिरविण्यासाठी व शेती समृद्धीची करण्यासाठी कृषि महोत्सव पर्वणी ठरणार आहे. पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे राज्यातील काही भागात जमिनी क्षारपड झाल्या आहेत. अशा जमिनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्याशिवाय शेती समृद्ध होणार नाही. त्यासाठी शासनाने अंदाजपत्रकात कृषी व कृषी संलग्न क्षेत्रासाठी 66 हजार कोटी रूपयांपर्यंत बजेट वाढविले. शेतीच्या विकासासाठी तिप्पट पैसा दिला आहे.
जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन उपलब्ध झाल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भूजल पातळी वाढल्यामुळे शेतकरी आज फळबाग, बागायती शेती करीत आहे. जिल्ह्यात 51 हजार हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्याला मदत करीत आहे. जिल्ह्यातील जिगांवसारखा मोठा प्रकल्प मार्गी लागला असून मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्याला मिळाला आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत हे सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पांमधून शेतीला पाणी देण्यासाठी यापुढे कालव्यांऐवजी पाईप कॅनालचा उपयोग केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांची दलालांच्या साखळीमधून मुक्तता करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना कृषि विभागात राबविण्यात आली आहे. यामुळे कृषि अवजारे, शेती साहित्य घेतल्यानंतर त्याची अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून कापूस ते कापड श्रृंखला विकसित होत आहे. त्यानुसार खामगांवातही टेक्सटाईल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 100 एकर जमीन मिळाली असून लवकरच पार्कच्या उभारणीला सुरूवात होणार आहे.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धत उपयोगात आणल्यामुळे थेट शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा झाली, तसेच राज्याचे 11 हजार कोटी रूपये वाचविणे शक्य झाले. बुलडाणा जिल्ह्यात 2 लाख 50 हजार 758 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी छाननीअंती 2 लाख 13 हजार 289 अर्ज पात्र ठरले. या सर्व पात्र शेतकऱ्यांना जवळपास 1129 कोटी रूपयांची कर्जमाफी मिळत आहे. तसेच पूर्ण माहितीअभावी प्रलंबित अर्जांवर निर्णय घेण्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीद्वारे आता धान्य खरेदीची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे हमी भावाला शेतकऱ्यांना माल विकता येणे शक्य असून दलालांपासून आर्थिक पिळवणूक थांबविता येणार आहे. सोयाबीनची केंद्र शासनाने निर्यातबंदी उठविली आणि आयातीवर शुल्क आकारले. परिणामी सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे.
गट शेती योजनेच्या माध्यमातून खर्च कमी करून उत्पादन दुप्पट करण्याचे काम शासन करीत आहे. या योजनेला 1 कोटी रूपयांचा निधी शासन देणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी संपूर्ण कृषी फिडर सौर कृषी वाहिनीवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा अखंड वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील आजारी सोसायट्यांपैकी 5000 संस्थांचे उर्जितीकरण करून त्यांचे बिजनेस मॉडेल बनविण्यात येणार आहे. यापुढे या संस्था शेतकऱ्यांना कृषी अवजारे, साहित्य पुरविणार आहे. या सोसायट्या गावागावात असून त्यांना यांत्रिकी बँक म्हणूनही विकसित केल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यात तीन दिवसांअगोदर नैसर्गिक आपत्ती आली. गारपिटीने शेतीचे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला. अशा परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. हवामानाच्या पूर्वकल्पनेसाठी राज्यभरात 1300 हवामान केंद्र कार्यान्वित झाली असून 2000 केद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. या हवामान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळणार आहे. परिणामी त्यांचे होणारे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. शेतीला कौशल्याची जोड देण्यासाठी केंद्र शासनासोबत करार करून शेतीमध्ये कार्यरत मनुष्यबळाला शेतीचे कौशल्य विकसित करून देण्यात येणार आहे. अशाप्रकारे कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असणार आहे. पहिल्या टप्प्यात 2.50 लक्ष तरूणांना शेती कौशल्याचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी म्हणाले, राज्य शासन अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना थेट खात्यात अनुदानाची रक्कम हस्तांतरित करून लाभ देण्यात येत आहे. यामुळे दलालांची साखळीमधून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे. या कृषि महोत्सवाच्या माध्यमातून जगाचे तंत्रज्ञान दारावर आले आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रदर्शन 20 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी मासिकाच्या कापूस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत 151 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विविध स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी मानले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.