नागपूर : नवनियुक्त राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज नागपूर खंडपीठाचा कार्यभार स्वीकारला. खंडपीठाकडे प्रलंबित अपील प्रकरणांचा गतीने निपटारा करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांच्याकडून श्री. पांडे यांनी नुकतीच पदाची शपथ घेतली होती. आज नागपूर खंडपीठ माहिती आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उपसचिव रोहिणी जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
सध्या कोविड संसर्ग आटोक्यात असल्याने नागपूर खंडपीठासमोर प्रत्यक्ष सुनावणी घेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नियोजन करावे. जिल्हानिहाय प्रलंबित प्रकरणे हाताळताना तक्रारदार तसेच संबंधित विभाग यांची सुनावणी कोविड सुरक्षा नियमांचे पालन करूनच घेण्यात येईल. यासाठी दूरदृश्य प्रणालीचा वापर करून गडचिरोली, गोंदियासारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील, असे श्री. पांडे यावेळी म्हणाले.
माहितीचा अधिकार कायद्याचा गैरवापर होणार नाही. तसेच विहित मुदतीत समाधान होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. अपील सुनावणीच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मनोदय राज्य माहिती आयुक्तांनी व्यक्त केला. ज्या विभागाशी संबंधित अपील प्रकरणे आहेत, त्या विभागांशी समन्वय करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी सूचना दिल्या.
यावेळी माहिती आयुक्त कार्यालयातील कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दिपाली शाहारे आदी उपस्थित होते.