गडचिरोली : राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2017-18 मधील पुरस्कारांमध्ये गडचिरोलीमधील पारडीकुपी ग्रामपंचायतील विशेष पुरस्कार देणेत आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते सदर पुरस्कार ग्रामपंचायतीला देण्यात आला. स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तिपत्रक व 3 लाख रु. बक्षीस स्वरुपात पारडीकुपी ग्रामपंचायतीला देण्यात आले.
सदर पुरस्कार ग्रामपंचायतीच्या वतीने संजय निखारे सरपंच पारडीकुपी, सचिव किशोर कुळसंगे, गटविकास अधिकारी, गडचिरोली मुकेश माहोर यांनी स्विकारला. ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता माणिक चव्हाण, गडचिरोली पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील पारडीकुपी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. गावातील स्वच्छता, हागणदारी मुक्ती, जलसंधारण अशा विविध विषयात विविध पुरस्कार पटकावले आहेत. तसेच गावाने स्मार्ट व्हिलेज म्हणूनही पुरस्कार या अगोदर पटकावला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम आल्यानंतर नागपूर विभागात द्वितीय क्रमांक पटकावला तर आता राज्यस्तरावर विशेष पुरस्कार पटकविण्यात यश मिळविले.
“गडचिरोली जिल्ह्यात आमच्या ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह इतर अनेक विषयात खुप काम केले आहे. अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत.आताही मिळालेला पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाने केलेल्या कामाचे फलित आहे.”
– संजय निखारे सरपंच पारडीकुपी.