महापौरांची संकल्पना साकार : गुरूवारी ना. नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण
नागपूर : नागपूर शहराचा रस्ते, उद्याने यापुढे चौफेर विकास व्हावा त्यात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचाही समावेश असावा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दुरदृष्टीकोनात्मक विकासाच्या संकल्पनेला जोड देत शैक्षणिक क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने मनपाद्वारे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने अत्याधुनिक ई-लायब्ररी साकार करण्यात आली आहे. गीतांजली चौक, गांधीबाग येथे नागपूर महानगरपालिकेद्वारे सुसज्ज, अत्याधुनिक, अद्ययावत ई-लायब्ररी तयार करून येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाची, स्पर्धेची गोडी लागावी ही संकल्पना आहे. ई-लायब्ररीला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि भविष्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे प्रज्ञावंत विद्यार्थी या लायब्रऱीतून घडावे या उद्देशाने या ई-लायब्ररीची संकल्पना पुढे आली व ती साकारण्यात आली, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्रिटीश ई-लायब्ररीच्या आधारावर या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररीची संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. लायब्ररीची इमारत तीन मजली असून संपूर्ण इमारत वातानुकूलित आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानीत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था, प्रशस्त सभागृह, दुसऱ्या माळ्यावर अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित लायब्ररी, वाचन कक्ष दिव्यांगांसाठी सुविधाजनक विविध सॉफ्टवेअरवर आधारित संगणक, प्रिंटर्स, लॉकर्स, तिसऱ्या माळ्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा असणार आहे. इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल राहणार असून संपूर्ण इमारतीसाठी लागणारी ऊर्जा सौर ऊर्जा पॅनलच्या माध्यामातून तयार होणार आहे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसोबत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनाही या अत्याधुनिक व वातानुकूलित लायब्ररीचा फायदा व्हावा, याकरिता या लायब्ररीचे शुल्क अगदी नाममात्र असणार आहे. या वास्तुचे आर्किटेक्ट प्रशांत सातपुते आहे. पत्रकार परिषदेत उपमहापौर मनीषा धावडे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक अॅड. संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक उपस्थित होते.
गुरुवार ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररीचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. महापौर दयाशंकर तिवारी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवितील. कार्यक्रमाला विशेषत्वाने खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, रा.काँ. पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यांची उपस्थिती असेल.
कार्यक्रमाला नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, ग्रंथालय अधीक्षक अलका गावंडे यांनी केले आहे.
ई-लायब्ररीचे ठळक वैशिष्ट्य
– एकूण भूखंड : ९१२.०६३ वर्ग मीटर (९८१७.०० वर्ग फूट)
बांधकाम क्षेत्र : ६२९.४४४ वर्ग मीटर (६७७५.०० वर्ग फूट)
– प्रस्तावित खर्च : बांधकाम – ३,८२,७८,२८५ रुपये, इंटेरियर कार्य – २,३७,९७,४३७ रुपये, एकूण : ६,२०,७५,७२२ रुपये
– तळमजला
पार्कींग, प्रसाधनगृह, दिव्यांगांसाठी विशेष प्रसाधनगृह
– पहिला माळा
१. ७४ क्षमतेचे सभागृह (वातानुकूलित, प्रोजेक्टर, ऑडिओ सिस्टीम)
२. सादरीकरण कक्ष (प्रेझेंटेशन रूम) : क्षमता ३० (वातानुकूलित, प्रोजेक्टर)
– दुसरा माळा
१. लायब्ररी : कोहा (KOHA) सॉफ्टवेअरद्वारे लायब्ररीचे संचालन, बुक शेल्फ, आरएफआयडी सुरक्षा गेट, सेल्फ बुक इशू किऑस्क, सेल्फ बुक डिपॉझिट किऑस्क. सर्व पुस्तकांना आयएफआयडी स्टिकर्स, पुस्तक पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी बुक स्कॅनर.
२. वाचन कक्ष (क्षमता १०)
३. दिव्यांगांसाठी वाचन कक्ष : अंध विद्यार्थ्यांसाठी JAWS रिडिंग सॉफ्टवेअर, अंधांसाठी टाईपबिलिटी टॉकिंग पीसी कीबोर्ड, मराठी बुक रिडर सॉफ्टवेअर, ब्रेल लिपीतील प्रिंटर, आंशिक अंधांसाठी मर्लिन डेस्कटॉप व्हिडिओ मॅग्निफायर सिस्टीम, अंधांसाठी SARA मजकूर वाचन मशीन.
४. विद्यार्थ्यांसाठी लॉकर रूम
– तिसरा माळा
संगणक कक्ष (मुले) : क्षमता २२
संगणक कक्ष (मुली) : क्षमता २२
कॉमन संगणक कक्ष : क्षमता २२
(वातानुकूलित, इंटरनेट सुविधेसह)
– चवथा माळा कॅफेटेरिया
इमारतीमधील सुविधा
१. सर्व माळ्यांना लिफ्ट सुविधा : कोणत्याही माळ्यावर दिव्यांगांना सहज जाता येणार
२. सर्व माळ्यांवर वातानुकूलित व्यवस्था
३. प्रशस्त वाचन आणि संगणक कक्ष
४. सर्व माळ्यांवर अग्निशमन यंत्रणा
५. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था