‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ’फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद
नागपूर: कोव्हिड विषाणू आणि त्यामुळे आलेली आपत्ती हे सत्य आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या आणि गैरसमज पसरविणाऱ्या संदेशांपासून सावध राहा. थोडा जरी ताप असला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आर.टी.पी.सी.आर. चाचणी करुन घ्या. आपली सतर्कता ही आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करेल. सोशल मीडियाच्या अफवांपासून दूर राहा, असे आवाहन डॉ. विजय उपाध्याय आणि डॉ. रवींद्र झारीया यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. आजचा विषय ‘डॉक्टर, मला ताप आहे’ असा होता. या विषयावर संवाद साधतानाच त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.
विषयासंदर्भात बोलताना डॉ. रवींद्र झारीया म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकांच्या मनात भीती, शंका, प्रश्न आहेत. नागरिकांनी स्वत:च सतर्क राहणे आवश्यक आहे. कुठलाही ताप एकदम वाढत नाही. तो हळूहळू वाढतो. ज्यावेळी ९९ ते १०० च्या दरम्यान ताप असेल तेव्हाच फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आर.टी.पी.सी.आर. चाचणी करून घ्यावी. निगेटिव्ह आलात तर चांगलेच आहे. मात्र पॉझिटिव्ह आलात तर योग्य ती काळजी घेता येईल. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही, याचीही काळजी घेता येईल. उपचार हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. सोशल मीडियावर बघून अथवा कोणी काही सांगितले म्हणून कुठलेही उपचार घेऊ नयेत, असे ते म्हणाले.
डॉ. विजय उपाध्याय म्हणाले, ताप येणे हे कोरोना संक्रमित असल्याचे एक लक्षण असू शकते. त्यामुळे कुठलाही हलगर्जीपणा न करता चाचणी करून घ्या. आता केंद्र शासनाने लसीकरण सुरू केले आहे. कोरोनावरील प्रतिबंधासाठी लस हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे सध्या लसीकरणासाठी जे-जे व्यक्ती पात्र आहेत, त्यांनी लसीकरण तातडीने करून घ्यावे जिल्हा प्रशासन, मनपातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. कुठलीही शंका आल्यास या क्रमांकावर फोन करून शंकेचे निरसन करून घ्यावे, असेही ते म्हणाले.