नागपूर : रेल्वेगाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना दररोज घडत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नागपूर रेल्वे स्थानकातून सुटलेल्या अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली.
अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस क्रमांक १२८३३ कामठी रेल्वे स्थानकावर संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान दोन मिनिटे थांबून पुढील स्थानकाकडे रवाना झाली. कामठी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कन्हान कामठी मिलिट्री कॅन्टोन्मेंट परिसरात रेल्वे रुळालगत असेलेल्या झुडप्यातून अज्ञातांनी दगडफेक केल्याचे रेल्वेच्या लोको पायलटने सांगितले.
अचानक ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. ही माहिती कामठी रेल्वे पोलीस दल आरपीएफ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला, मात्र दगडफेक करणारा सापडला नाही.
सुमारे 10 मिनिटे घटनास्थळी थांबल्यानंतर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने पुढे प्रास्थान केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.