आत्मविश्वासाने कोरोनाशी संघर्ष करू देशात परकीय गुंतवणूक वाढली पाहिजे
नागपूर: आपल्याला दररोज लागणार्या लहान लहान वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. ज्या वस्तू आपण आपल्या देशात बनवू शकतो, त्या बनवून आयात थांबविण्याचा आपला प्रयत्न आहे. काही वस्तूंची आयात रोखण्यात आपण यशस्वीही झालो आहोत. काही वस्तूंबाबत आपण अभ्यास करीत आहोत. आपले तंत्रज्ञान अद्ययावत करून त्या वस्तू येथे बनविणे शक्य असल्याचे लक्षात आल्यावर आयात थांबविली आहे. अशी चार हजार कोटींची आयात देशाने थांबविली असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी नागपुरात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोना हे जागतिक संकट आहे. नैसर्गिक संकट नाही तर मानवनिर्मित संकट आहे. प्रगती आणि अर्थव्यवस्थेसाठी हा स्पीड बे्रकर निर्माण झाला आहे. यावर जोपर्यंत औषध निघत नाही, तोपर्यंत आत्मविश्वास आणि सकारात्मक विचाराने या संकटाचा सामना करावा लागणार आहे. हे करताना यात राजकारण केले जाऊ नये. जात, धर्म, भाषा, प्रांत आणि पक्ष बाजूला ठेवून लोकांची सेवा करणे आपले कर्तव्य असल्याचे समजून काम करावे. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व पंतप्रधान मोदी यांनी केलेली घोषणा साकार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करून दाखवू असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.
सरकारकडे पगारासाठी पैसा नाही, मजुरांचे हाल, व्यापार्यांची पंचाईत अशा सर्वांवरच हे संकट कोसळले आहे. पण यातून बाहेर पडणेही आवश्यक आहे. पंतप्रधानांनी 20 हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. राज्य शासनाने 20 हजार कोटीचे द्यावे आणि 10 हजार कोटी पीपीई गुंतवणुकीतून अर्थव्यवस्थेत आले तर अर्थव्यवस्था सुधारेल. लोकांकडे पैसा आला पाहिजे. लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, यासाठी हे करणे आवश्यक आहे. कोरोनासोबतच आर्थिक लढाईही जिंकायची आहे, असेही ते म्हणाले.
आजच्या स्थितीत चीनसोबत कुणीही व्यवहार करायला तयार नाही. ही गुंतवणूक भारतात आणण्यासाठी चांगली संधी आहे. त्यासाठी योग्य ते निर्णय व परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांनी तर आपापल्या राज्यात परकीय गुंतवणूक कुणी करीत असेल तर मजूर कायद्यात सुधारणा करण्याची तयारीही दर्शविली आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- पीपीई कीट, सॅनिटायझर, उदबत्तीच्या काड्या, आयस्क्रिमचे चमचे या वस्तू आपल्या देशातही बनविता येतात. यासाठी आयातीची गरज नाही, हे सिध्द झाले आहे. उलट आयात किमतीपेक्षा स्वस्तात या वस्तू येथे बनल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान आणून आयात बंद झाली तर देशात रोजगार निर्माण होणार आहे.
इथेनॉल, बायोडिझल, इलेक्ट्रिक, प्लास्टिक पंप आपल्या देशात तयार होत आहे. त्यामुळेच या वस्तूंवरील आयात ड्युटी सरकारने वाढविली आहे. यामुळे 4000 कोटींची आयात कमी झाली आहे. ई रिक्षा,पाणीपुरीवाले, वडापाववाले, भाजी विक्री या लहान उद्योगांना आता अॅग्रो एमएसएमई अंतर्गत कर्जपुरवठा केला जाणार आहे. या दिशेने एमएसएमईचे काम सुरु झाले आहे. या लहान उद्योगांसाठी विशेष योजना तयार होत आहे. कोरोना असताना शासनाने लहान लहान उद्योग सुरु केले आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येणार व यातूनही मार्ग काढत आपण या संकटावर मात करू असा विश्वासही गडकरींनी यावेळी व्यक्त केला.