लातूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यापार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजाचे नेतृत्व करत आहेत. समजत जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहावे असे पाटील सातत्याने सांगत आहे. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर वारंवार मराठा समाजावर टीका करत आहेत. यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याबरोबरचे लोक आवरावे आणि दिलेला शब्द पाळावा, अन्यथा परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे, असा इशारा पाटील यांनी दिला.
गोरगरीब लोकांचे चांगले संबंध आहेत ते खराब करू नका. राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका, असेही ते म्हणाले. मंगलप्रभात लोढा कोण आहेत? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. फडणवीस यांना लक्षात आले पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे, आपण सरकार चालवतो. राज्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यांच्या लोकांनी असे स्टेटमेंट केलं नाही पाहिजे. फडणवीसांनी जे शब्द दिले त्याचा आम्ही सन्मान केला. आरक्षण देतो, गुन्हे मागे घेतो, अटक करणार नाही ,असे आश्वासन त्यांनी मराठा बांधवाना दिले. मात्र त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.
फडणवीस साहेब, मराठा समाजाने तुम्हाला 106 आमदार दिले आहेत. त्याची परतफेड मराठ्यांवर डाव टाकून करू नका. तुमचे पाच सात लोक आहेत ते कायम मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. ही गोष्ट गंभीरपणे घ्या नाही तर 24 डिसेंबरनंतर परिणाम दिसतील. तुम्ही या लोकांना आवरा, ठरल्याप्रमाणे सगळे करा. तुम्ही डाव टाकला आहे गोड बोलायचे काम करायचे नाही. मराठा जागृत झाला आहे पहिल्या सारखा तो राहिला नाही याचे भान ठेवून काम करावे. भुजबळांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या मुलांवर अन्याय करणार असाल तर याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.