मनपा आयुक्तांचे आदेश : क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा, जरीपटका मेकोसाबाग येथील रस्ते राहणार बंद
नागपूर: शहरात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील विविध ठिकाणची वाहतूक बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
यामध्ये सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डाव्या बाजूची वाहतूक २० डिसेंबर ते २० मार्च २०१९ दरम्यान बंद राहील तर उजव्या बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.
याशिवाय सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा ते वंजारी नगर पाण्याची टाकी दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील उजव्या बाजूची वाहतूक २० डिसेंबर ते २० मार्च २०१९ दरम्यान बंद राहील. सदर ठिकाणी डाव्या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.
सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये मंगळवारी रेल्वे क्रॉसिंग गेट हरिजन कॉलनी जुना जरीपटका मेकोसाबाग ते सी.एम.पी.डी.आय. नारा घाट रोड दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत असल्याने या रस्त्यावरील उजव्या बाजूची वाहतूक १५ डिसेंबर ते १५ मार्च २०१९ दरम्यान बंद राहील. सदर ठिकाणी डाव्या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.