नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलेच झापले आहे. विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावे की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही सरन्यायाधीश म्हणाले आहेत. पोरखेळ करताय का? असे म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना खडेबोल सुनावले आहे.
या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल. आम्ही हे जाणतो की विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचा भाग आहे, त्यामुळेच आम्ही कुठलीही टाईमफ्रेम देत नाही आहोत, पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावंच लागेल, असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. जर निश्चित वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून आलं नाही, तर मात्र आम्हाला आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या मर्यादेत अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागेल, असेही सरन्यायाधीश म्हणाले आहेत.