कोराडी :मुला-मुलीच्या जडणघडणीत आईची भूमिका जितकी मोलाची असते अगदी त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापकांनी देखील स्वत:मध्ये सातत्याने कौशल्य गुण विकसित करून आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला विकसित करावे. महानिर्मितीने आपल्याला भरभरून दिले आहे आता प्रत्यक्ष कृतीतून परतफेड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत थोटवे यांनी केले.
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया (आस्की) हैदराबादच्या तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या सहकार्याने महानिर्मितीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी क्षमता विकास तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कोराडी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रत्येकामध्ये जन्मत: क्षमता गुण असतात मात्र त्यास विकसित करण्याकरिता पाहिजे तितके लक्ष न दिल्याने किंवा त्यास योग्य तऱ्हेने न हाताळल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. व्यवस्थापकीय क्षमता विकसित करताना “लक्ष्य” व “यश” यामधील अंतर कमी-कमी करत जाणे आणि त्याकरिता रणनीतीक व्यवस्थापनाचे नियोजन करावे लागते. सहभागी प्रशिक्षणार्थीशी त्यांनी संवाद साधून व्यवस्थापन विषयक मुलभूत प्रश्नांना हात घातला आणि व्यवस्थापन कौशल्याचे सात मंत्र दिले त्यात दृष्टीकोन, वृत्ती, योग्यता, क्रिया, विश्लेषण, साध्य व यश या गुणांचा समावेश होता.
उदघाटनपर समारंभाचे अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे, मुख्य अभियंता(प्रशिक्षण) दिलीप धकाते, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया हैदराबादचे तज्ज्ञ प्रशिक्षक डॉ. बी. लक्ष्मी, के.आर. राघवन प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे झाल्यास तांत्रिक व व्यावसायिक ज्ञानासोबतच अद्ययावत व्यवस्थापकीय कौशल्य गुण आणि कोर्पोरेटमधील प्रत्येक व्यक्तीने शाश्वत विकासाचा विचार मनी जोपासून ब्रांड म्हणून काम केले पाहिजे असे मत दिलीप धकाते यांनी प्रास्ताविकातून मांडले. समारंभाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मिलिंद रहाटगावकर यांनी केले. यामध्ये सुमारे २५ अधिकारी सहभागी झाले आहेत.
तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कोराडी प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक अभियंता आनंद मेश्राम, कार्यकारी अभियंता विनय हरदास, सारिका सोनटक्के, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ.किशोर सगणे, प्रवीण तीर्थगीरीकर व चमूने विशेषत्वाने परिश्रम घेतले.