नागपूर : महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की प्रत्येक झोन कार्यालयामध्ये स्वागत कक्ष तयार करण्यात यावे. तसेच जुने रेकॉर्ड सहा बंडल पद्धतीने ठेवण्यात यावी आणि झोनमधील महत्वाच्या प्रकल्पांना भेट द्यावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर लवकर दिलासा मिळावा यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात आयुक्तांनी बुधवारी (ता. १२) सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, उपायुक्त उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, विजय थुल, विकास रायबोले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेल्या प्रत्येक बाबींवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच संकेतस्थळ ‘यूजर फ्रेंडली’ करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. मनपाने सुरु केलेल्या सर्व सेवांचा संकेतस्थळामध्ये अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपा आणि झोन कार्यालयांच्या सखोल स्वच्छतेचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले. झोन कार्यालय तसेच परिसरात देखील स्वच्छता राखली जावी, कार्यवाहीमध्ये जप्त साहित्य, वाहन आदी पडून असल्यास ते अन्य ठिकाणी जमा करुन त्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही या महिन्याच्या अखेरपर्यंत करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये दिव्यांगांकरिता माहिती फलक अद्ययावत करणे तसेच प्रत्येक झोनमध्ये पिण्याचे पाणी, अभ्यागत कक्ष यांची व्यवस्था देखील अद्ययावत करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले. आयुक्तांनी सर्व झोन अधिकाऱ्यांना दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांकरिता सायंकाळी ३.३० ते ५.३० पर्यंतची वेळ राखीव ठेवण्याबाबत देखील निर्देश दिले.
तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी निकालात काढण्याची गती वाढविण्याबाबत सुद्धा आयुक्तांनी निर्देशित केले. तक्रार निवारण पोर्टलसोबतच मनपा मुख्यालय तसेच झोनमध्ये नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या तक्रारी व त्यावरील प्रतिसाद याचे रेकॉर्ड ठेवून प्रलंबित सर्व निकाली काढणे व तक्रारींच्या निराकरणासंदर्भात झोनस्तरावर चमू तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आयुक्तांनी नोडल विभाग म्हणून जबाबदारी निश्चित केली.