नागपूर: फिरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी हा वाकी येथील कन्हान नदीच्या डोहात बुडाला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी शोधाशोध केली, परंतु त्याचा शोध घेण्यात यश येऊ शकले नाही.
राजा मिश्रा (१६, रा. टीव्ही टॉवर, सेमिनरी हिल, नागपूर) असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जी. एस. कॉमर्स महाविद्यालयाच्या ११ वीचा विद्यार्थी आहे. नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी महाविद्यालयीन सात मित्रांसह तो वाकी येथे आला होता. वाकी येथील दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर ते सर्व कन्हान नदीपात्राच्या परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी फोटोसेशन केले.
दरम्यान, राजा हा कपडे व मोबाईल काढून पोहण्यासाठी उतरला. अशातच खोल पाण्यात गडप झाला. बराच वेळ होऊनही राजा बाहेर न आल्याने त्याच्यासोबतच्या मित्रांनी याबाबत पारशिवनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांना राजाचा शोध घेता आला नाही. अंधार होताच पोलिसांनी शोधमोहीम थांबविली.