नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा आज मंगळवारपासून सुरू झाली आहे. यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने परिक्षार्थींच्या मनात धाकधुक सुरू होती.इंग्रजीच्या पेपरसह सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देत आहेत. तर 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडत आहे.
गैर प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर-
बोर्डाची परीक्षा असल्याने कोणतेही गैर प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. अशातच आज बारावीचा पहिलाच पेपर असल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळत आहेत.
एकूण 15 लाख 5 लाख 37 विद्यार्थी देणार पेपर –
यंदा बारावीच्या एकूण 15 लाख 5 लाख 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली असून यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली तर 37 ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 7 लाख 68 हजार 967, कला शाखेचे 3 लाख 80 हजार 410 आणि वाणिज्य शाखेचे 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत.
नागपूर विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर स्वागत-
नागपूर विभागातील 504 केंद्रांवर 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेत 1,58, 537 विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली.कुठे औक्षण करत तर कुठे गुलाबाचे फूल हातात देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर स्वागत करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.