Published On : Fri, Feb 2nd, 2018

जगातील अव्वल अर्थव्यवस्था बनण्यासाठी विद्यार्थी, युवकांची शक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई: भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, त्यासाठी तुम्ही विद्यार्थी ताकद बनू शकता असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याकडे लक्ष देण्याचे तसेच मानसिकता बदलून प्रयोगशील राहण्याचे आवाहन केले तसेच “सोच बदलोगे तो भारत बदलेगा” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या खासगी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “शिक्षण ते उद्योजकता” या विषयावरील एक दिवसाच्या परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारत २०२० मध्ये जगातील सर्वात तरूण देश बनत आहे. परंतु युवा लोकसंख्या आणि मानव संसाधन यामध्ये फरक आहे. लोकसंख्येत कुणाचाही समावेश असू शकतो परंतु मानव संसाधनामध्ये रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाचा समावेश होत असतो. त्यामुळे मानव संसाधनामध्ये भारताला प्रस्थापित करण्यासाठी भारताने जगाच्या आवश्यकता समजून घेण्याची गरज आहे. जगाला भारतात संधी दिसते पण ती संधी आपल्याला दिसते का? याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आपल्याला जॉब सिकर नाही तर जॉब क्रिएटर व्हायचे आहे. तशी मानसिकता युवकांच्या मनात रुजवायची आहे. जग वेगाने बदलत आहे. ती दिशा समजून घेण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने क्रांती केली असून डिजिटल तंत्रज्ञानाने कल्पनाशक्ती जिथपर्यंत पोहोचू शकते ते साध्य करण्याची ताकद दिली आहे. यामुळे व्यवहारात पारदर्शकता देखील आली आहे.

शासनाने स्टॅण्डअप, स्टार्ट अप आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेसारख्या योजना यासाठी आणल्या आहेत. १० कोटी लोकांना स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेतून कर्ज वितरित करण्यात आले आहे. यामध्ये ७ कोटी महिला आहेत. दीड कोटी अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती आहेत, जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत तयार आहे, गरजांचा शोध घेऊन प्रयोगशील राहण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले. सर्व समाजाला विकासाच्या मुख्य धारेत आणून देशाला पुढे नेण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन या शासनाने सर्वांना समान संधी देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. एक वर्षात अल्पसंख्याक समाजातील ३.५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

परिसंवादात हनुमंतराव गायकवाड, अजित गुलाबचंद आणि इतर मान्यवरांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. या सर्वांनी विद्यार्थ्यांना रोज नवीन शिकण्याची तयारी ठेऊन करत असलेल्या कामात एक्सलंस आणण्याचे आवाहन केले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु अमरीश पटेल, ॲक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया, हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी लि.चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अजित गुलाबचंद, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, तालिम ओ तर्बियत चे संस्थापक जफर सरेशवाला आदी उपस्थित होते.

Advertisement