नागपूर: पूर्वी महानगरपालिकेच्या शाळेशिवाय शिक्षणासाठी दूसरा पर्याय नसायचा मात्र पुढे खाजगी शाळांच्या स्पर्धे पुढे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे यश हे झाकोळले गेले. मात्र आज लागलेल्या बारावीच्या निकालाने सिद्ध केले आजही मनपा शाळेतील विद्यार्थी हे गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी नाही असे वक्तव्य कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.
मंगळवार दिनांक ३० मे रोजी मनपा मुख्याल्यातील महापौर कक्षात कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते मनपा शाळेतील १२ च्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तुळशीचे रोप व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण विशेष समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चापले, शिक्षण अधिकारी फारुख अहमद, माजी नगरसेवक हबीब उर असांरी, दिलीप गौर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पार्डीकर म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांनी या पुढील कारकिर्द निवडताना शेजाऱ्यांशी स्पर्धा न करता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा या मराठीत देखिल होत असून ही परिक्षा उत्तीर्ण केल्यास सरळ उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पटवारी निरीक्षक यासारखी पदे मिळवता येतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षा देण्याकडे कल वाढवावा. यावेळी मनपा शाळेवर विश्वास दाखविणाऱ्या पालकांचे पर्डीकर यांनी विशेष कौतुक केले. सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी १० व १२ वी बोर्डाची परिक्षा देणाऱ्यांना किती मेहनत करावी लागते याची जाणीव असल्याचे सांगितले. कला, वाणिज्य किवा विज्ञान कोणतीही शाखाअसो या पुढे देखिल कोणत्याही क्षेत्रात गेल्यास तिथे देखिल यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करा असे आर्शिवचन दिले. जिवनात या पुढे देखिल आपले आई-वडील, शिक्षक व नागपूर महानगरपालिकेच्या शाळेचे नाव मोठे करा, गौरवान्वित करा अश्या शुभेच्छा प्रदान केल्या.
प्रास्ताविकेत शिक्षणाधिकारी फारुख अहमद यांनी मनपा शाळेत गरीब मुले शिक्षण घेतात, पुढील शिक्षणात देखिल मनपाच्या होतकरु विद्यार्थ्यांना कोणतीही अचडण आल्यास शिक्षण समिती, महापौर व उपमहापौर सदैव या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन दिले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी देशकर, एम.ए.के. आझाद उर्दू उ.मा.शा. च्या मुख्याध्यापक निखत खान, साने गुरुजी उर्दू
उ.मा.शा.चे मुख्याध्यापक वामन मून, ताजाबाद उर्दू उ.मा.शा.चे मुख्याध्यापक अजीज खान उपस्थित होते. सुत्र संचालन सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांनी केले. आभार शाळा निरीक्षक प्रिती बंदेवार यांनी मानले.
मनपा शाळेची नेत्रदिपक प्रगती
मनपाच्या चारही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये नेत्रदिपक यश प्राप्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उ.मा.शा. चा निकाल ९६.८७ टक्के, साने गुरुजी उर्दू उ.मा.शा. चा निकाल ९३ टक्के, ताजाबाद उर्दू उ.मा.शा चा निकाल ८७.३४ टक्के तर एम.ए.के.आझाद उर्दू उ.मा.शा.चा निकाल ८४.८३ टक्के लागला. मनपाच्या चारही शाळा मिळून एकूण ८८.४१ टक्के निकाल लागला. मनपा शाळेचा मागील वर्षी ८८.३२ टक्के निकाल लागला होता.
गुणवंत विद्यार्थी
एम.ए. के.आझाद उर्दू कला शाखेतील आरिया बानो अहमद करीम कुरेशी हिने ७८.६१ टक्के, साजिया कौसर मकबुल अहमद हिने ७६.३ टक्के, साने गुरुजी उर्दू शाळेतील निखत परवीन जीब्राईल खान हिने ७५.०७ टक्के पटकावून नेत्रदिपक यश प्राप्त केले. वाणिज्य शाखेत एम.ए.के. आझाद उर्दू शाळेतील सिमरन शेख शकील हिने ७९.०८ टक्के, शोयब अब्दुल रहीम याने ६६.६१ टक्के, ताजाबाद उर्दु शाळेतील रमजान मो. रफीक याने ६६.४२ टक्के गुण पटकावले तर विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील ऋतिका झोडापे हिने ७१.३८ टक्के, रुचिरा अडकिने हिने ७०.७६ टक्के तर एम.ए.के.
आझाद उर्दू शाळेतील शाईस्ता बानो हिने ६९.३८ टक्के गुण प्राप्त केले.