Published On : Fri, Apr 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

खाजगी वाहन सोडून विद्यार्थ्यांनी मेट्रोने यावे, आठवड्यात एक दिवस होणार सक्तीचा

Advertisement

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये झालेल्या मेट्रो संवादात प्राचार्यांचे आवाहन

नागपूर : धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकरिता “मेट्रो प्रवास म्हणजे उत्तम आरोग्य, स्वच्छ नागपूर आणि हरित पर्यावरण” या विषयावर नागपूर मेट्रोतर्फे `मेट्रो संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कॉलेजच्या प्राचार्यांनी याप्रसंगी अभिनव उपक्रम राबवणार असल्याची घोषणा केली, आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांनी पैदल, सायकलने किंवा कॉलेजच्या नजीकच असणाऱ्या काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचा लाभ घेऊन मेट्रोने कॉलेजला पोहचावे, हा एक दिवस निश्चित करून तो सक्तीचा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी संपूर्ण चमूसह प्राचार्यांनी मेट्रोने प्रवास करून ती सर्व दृष्टीने अनुकूल असल्याची खात्री देखील करून घेतली. हा अशाप्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच नागपुरातील महाविद्यालयातच नव्हे तर शहरात राबवला जाणार आहे.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेट्रो संवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनचे ब्रँड एम्बॅसॅडर म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ जयवंत वडते यांची नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव आणि वाढत्या हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणायचे असेल आणि आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर आपण सर्वानी सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करायला पाहिजे. सध्याची असंतुलित पर्यावरणाची परिस्थिती लक्षात घेता आपण सर्वाना विशेषतः युवाशक्तीने मिळून पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले पाहिजे. राष्ट्रहित आणि स्वच्छ नागपूर, आरोग्य आणि आर्थिक बचत, वेळेचे नियोजन, पर्यावरण संवर्धन या सर्व दृष्टीने अनुकूल मेट्रोचा उपयोग प्रत्येकाने करावा असे आवाहन प्राचार्य श्री वडते यांच्यातर्फे करण्यात आले. येत्या काही दिवसात धनवटे नॅशनल कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्यात एक दिवस खाजगी वाहनाचा वापर टाळून चालणे, सायकल चालवणे, मेट्रोचा उपयोग उपयोग करत महाविद्यालयात येण्याचा उपक्रम सक्तीचा करण्यात येणार असल्याची घोषणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली. या निर्णयातून सर्वानी प्रेरणा घ्यावी आणि देशाच्या विकासात हातभार लावावा असे धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ जयवंत वडते ह्यांनी कार्यक्रमाप्रसंगी आवाहन केले.

नागपुरात माझी मेट्रो स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचा, तसेच खिशाला परवडण्यासारखा, सुलभ आणि सुरक्षित असा एकमात्र उत्तम पर्याय आहे असे महा मेट्रोच्या डेपो विभागाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री संजय कुमार म्हणाले. संयुक्त महाव्यवस्थापक श्री महेश गुप्ता यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महामेट्रोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची, सोयी-सुविधांची आणि सवलतींची विविध माहिती कमर्शिअल विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्री राव यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. महामेट्रोने दिव्यांगांकरिता केलेल्या सुविधा, मेट्रोच्या फीडर सेवा, मल्टीमोडेल इंटिग्रेशन, नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टेशनसाठी महा मेट्रोने केलेले प्रयत्न, पर्यावरण संवर्धनासाठीच्या योजना इत्यादींबद्दल सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ जयवंत वडते, प्रमुख अतिथी महा मेट्रोचे अधिकारी श्री संजय कुमार (अतिरिक्त महाव्यवस्थापक, डेपो), श्री महेश गुप्ता (संयुक्त महाव्यवस्थापक, एमएमआय), श्री एस जी राव (उपमहाव्यवस्थापक, कमर्शिअल) तसेच धनवटे नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ राजकुमार गिरी गोसावी, प्रा. रवींद्र गुंडे, जनसंवाद विभाग प्रमुख प्रा. नितिन कराळे, इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनवटे नॅशनल कॉलेजचे प्रा. डॉ राजकुमार गिरी गोसावी यांनी केले आणि आभार प्रा रवी गुंडे यांनी व्यक्त केले.

Advertisement
Advertisement