मानवता प्राथमिक व हायस्कुलमध्ये पर्यावरण रक्षण सप्ताह सपन्न
आपल्याला पृथ्वीवर जे पर्यावरण, नैसर्गिक स्रोत मिळाले आहेत. ते मागच्या पिढीकडून ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करणे ही लहानांपासून तर मोठयांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे शालेय जिवनापासूनच प्रत्येक विद्यार्थ्यांनी पर्यावरण सरंक्षण ही जबाबदारी समजून पर्यावरण संवर्धनाचे प्रामाणिक रक्षक व्हावे, असे प्रतिपादन मानवता प्राथमिक व हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. चारूशिला डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले.
बुधवारी ३० मार्च रोजी कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कुल येथे 20 ते 27 मार्चदरम्यान पर्यावरण रक्षण सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे तर विशेष अतिथीमध्ये नगरसेवक मनोज गावंडे, पर्यवेक्षक व्ही. व्ही. गजबे, किशोर गहुकर यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात पर्यावरण रक्षण सप्ताहाअंतर्गत मानवता प्राथमिक व हायस्कुलमधील विद्यार्थ्यांसाठी आठवडाभर जागतिक चिमणी दिन, जागतिक कविता दिन, आंतरराष्ट्रीय रंग दिन, आंतरराष्ट्रीय वन दिन, जागतिक जल दिन तसेच जागतिक हवामान दिनाबाबत राबविण्यात आलेल्या स्पर्धांची माहिती प्रास्तविकेतून पर्यवेक्षक गहूकर यांनी दिली. यात पक्षी व जनावरांसाठी घरटी तयार करणे, निसर्गपर कवितांचे चित्र प्रदर्शन, पर्यावरण पूरक रंग तयार करणे, वन दिनी निबंध स्पर्धा, जल दिनी घोषवाक्य स्पर्धा तसेच हवामान दिनी नाटय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना नवयुवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे म्हणाले की, आज पृथ्वीवरचे ‘निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेले मोठे वरदान आहे. या निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे संरक्षक बनने गरजेचे आहे. तुम्ही आता विद्यार्थी आहात उद्या भावी नागरिक होणार आणि तुम्हाला पर्यावरण रक्षणाचे संस्कार हे शालेय स्तरावर मिळाले तर तुम्ही पुढच्या पिढीला पण हेच संस्कार देणार. आणि यामुळे निसर्गाचे समोतोल राखण्यास मदत होणार, असेही संकेत डोंगरे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन नवव्या वर्गाची विद्यार्थिनी कु.आर्या शंभरकर हिने तर आभार अभिषेक शेंदरे यांनी मानले.