नागपूर : गेल्या चार दिवसांपासून नागपुरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला. पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केले असून नदी नाले दुतर्फा ओसंडून वाहू लागले आहेत. तर शहरात ठिकठिकाणी रस्ते तुंबले आहे.अशातच पारडीच्या सुभान नगरमध्ये जमीन खचल्याची घटना समोर आली. त्यामुळे येथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सुभान नगर परिसरात याअगोदर पडलेल्या पावसामुळे दोन ठिकाणी २० ते २५ फुटाचे खड्डे पडले आहे. तर यंदा जमीन खचून पडलेला हा खड्डा जवळपास २० फुटाचा असल्याची माहिती आहे. सिमेंट रस्त्याचा हा खचलेला भाग असून बाजूलाच लागून घर आल्याने येथील स्थानिकांनी भीती व्यक्त केली.