शहरातील ऑटो स्टॅन्डच्या जागेसंबंधात महापौरांनी घेतली बैठक
नागपूर : शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात ऑटो स्टॅन्ड आणि पार्किंगची योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे. यासाठी पुढील एक महिन्यात नविन वसाहती प्रमाणे पहाणी करून ऑटो स्टॅन्डचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. सोमवारी (ता.२२) महापौर कक्षात ओला/उबेर वाहनांना जागा उपलब्धतेकरिता तसेच शहरात असलेल्या ऑटो स्टॅन्डच्या जागेसंबंधात महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धूरडे, जेष्ठ नगरसेवक सुनिल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, वाहतूक नियोजन अधिकारी शकिल नियाजी, पोलीस निरिक्षक (वाहतूक) अजयकुमार मालवीया, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव तसेच स्मार्ट सिटीच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर आदी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, सध्या शहरात असलेले २५५ ऑटो स्टॅन्ड याव्यतिरिक्त नविन वसाहतीमध्ये पाहणी करून एक महिन्यात नवीन स्टॅन्डसाठी जागेचे प्रस्ताव सादर करावेत. यासाठी परिसरातील नागरी संघटना, ऑटो संघटनांशी चर्चा करण्याची सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली. शहरात अनेक ओला/उबेच्या टॅक्सी आहेत यांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबत महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, शहरात असलेल्या ऑटो स्टॅन्डच्या व्यतिरिक्त गर्दिच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्टॅन्ड, शहरातील विविध मार्केट परिसर) ओला/उबेरसाठी नविन स्टॅन्ड तयार करण्यात यावे. तसेच रेल्वे स्टेशन वर ओला/उबेर टॅक्सींना प्रवेश मिळावा यासाठी सुध्दा महापौरांनी वाहतूक पोलीस निरिक्षकांशी चर्चा केली. यासोबतच इतवारी, गांधीबाग सारख्या परिसरात मालवाहक वाहनांसाठी स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याची सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली.
महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, शहरात अनेक ठिकाणी अवैध पार्किंग केली जात आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होउन वाहतूक ठप्प होत आहे. यावर तोडगा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक नियोजन अधिकारी आणि पोलीस निरिक्षक (वाहतूक) यांनी संयुक्तरित्या परिसराची पाहणी करून नागरिकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. खासकरून गितांजली चौक, सीए रोड, मेयो रुग्णालय परिसर, डागा रुग्णालय परिसर, गांधीबाग मार्केट, नंदनवन रोड, सक्करदरा, बुधवार बाजार, गोकुलपेठ, भगवाघर चौक इत्यादी परिसरात अवैध पार्किंग होत आहे. त्यामुळे अशा अवैध पार्किंग करणाऱ्या नागरिकांवर करवाई करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.
स्मार्ट सिटी अंतर्गत सिव्हिल लाईन परिसरात सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे, केन्द्र शासनाचे शहरी व गृहनिर्माण मंत्रालय तसेच स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत सी.एस.आर. निधीतून हा सायकल ट्रेक तयार करण्यात आला आहे. नागरिकांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देणारे सायकल ट्रेक वर काही नागरिकांनी आपल्या वाहनांची पार्किंग करणे सुरु केले आहे. अशी माहिती डॉ. प्रणिता उमरेडकर यंनी दिली. अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.