नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील सर्वच विभागातून निघालेल्या भंगाराचा अहवाल सात दिवसात प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. गुरूवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
बैठकीला आयुक्त अश्विन मुदगल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग ) महेश धामेचा, स्मिता काळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, उद्यान अधीक्षक धनंजय मेंडूलकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, हिवताप व हत्तीरोग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी मनपातील विविध विभागाच्या भंगाराबद्दल माहिती जाणून घेतली. विद्युत विभागाकडे भंगारात असलेले विद्युत खांब, लाईट्स, स्टार्टर आणि इतर उपकरणे विकण्यात येत असून त्यातून उत्पन्न प्राप्त होते. जे भंगारातील सामान कामात येईल, त्याचा पुनर्वापर देखील करण्यात येत असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिली. यानंतर उद्यान विभागाची माहिती महापौरांनी घेतली. अंबाझरी उद्यानातील भंगाराची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
अतिक्रमण विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या भंगाराचा आढावा महापौर व आयुक्तांनी घेतला. जप्त करण्यात आलेल्या भंगाराच्या सामानाची यादी करण्यात आली की नाही, याची पडताळणी करा व त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी सहायक आयुक्त महेश धामेचा यांना दिले. झोननिहाय भंगाराचा आढावा घेण्यात आला. जलप्रदाय विभागाचे भंगार इतर सर्वत्र आहे. त्यांनी त्याची यादी करून त्यातून किती उत्पन्न प्राप्त होऊ शकते, याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मनपाच्या कारखाना विभागाचा, अग्निशमन, शिक्षण विभागातून निघाणाऱ्या भंगाराचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला यावेळी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, सतरंजीपुरा झोनचे सहायक आय़ुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, मंगळवारी झोनचे सहायक आय़ुक्त हरिश राऊत उपस्थित होते.