Published On : Thu, Feb 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सावंगी रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यांमध्ये केले कृत्रिम डिस्कचे प्रत्यारोपण पस्तीस वर्षीय तरुणाला मिळाला जीवघेण्या दुखण्यात दिलासा
Advertisement

वर्धा – मानेच्या दोन मणक्यांमधील क्षतिग्रस्त डिस्क अर्थात गादी काढून संपूर्ण कृत्रिम डिस्कचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिरोग विभागात करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे मणक्यांच्या तज्ज्ञ शल्यचिकित्सकांनी पस्तीस वर्षीय तरुणाची जीवघेण्या मानदुखीसह चालताना होणाऱ्या त्रासातूनही मुक्तता केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील निवासी उमेश जयस्वाल (३५) याला मानेच्या वरील व खालील भागात असह्य वेदना होण्यासोबतच हातापायाला मुंग्या येण्याचा व मान बधिर होण्याचा त्रास गत वर्षभरापासून सुरू होता. मागील चार महिन्यांपासून त्याला चालताना हा त्रास अधिक प्रकर्षाने जाणवायला लागला. या त्रासाचा परिणाम दैनंदिन जीवनशैलीवर आणि कामावर होत असल्याने रुग्णाची अस्वस्थता वाढत गेली. इतरत्र समाधानकारक उपचार न झाल्याने अखेर रुग्णाने सावंगी मेघे रुग्णालयाकडे धाव घेतली. सावंगी रुग्णालयातील अस्थिरोग विभागात रुग्णाच्या मानेची एमआरआय तपासणी करण्यात आली.

यात मानेची लवचिकता जोपासणाऱ्या गादीवर मणक्यांचा अतिरिक्त दाब आल्यामुळे हालचालीत अडथळा निर्माण झाल्याचे आढळून आले. कालांतराने याचा परिणाम पाठीच्या कण्यावर होऊन अपंगत्व येण्याची शक्यता निर्माण झाली होती. रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन स्पाईन सर्जन डॉ. सोहेल खान यांनी शस्त्रक्रियेद्वारे क्षतिग्रस्त डिस्क काढून त्याऐवजी कृत्रिम डिस्कचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. खान यांच्यासह शल्यचिकित्सक डॉ. कश्यप कनानी व डॉ. विपुल अग्रवाल यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेली. या शस्त्रक्रियेत त्यांना बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डॉ. संज्योत निनावे, डॉ. ऐश्वर्या नायक तायडे आणि वैद्यकीय चमूचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

Advertisement

कृत्रिम डिस्क रोपणाची पहिली शस्त्रकिया – डॉ. खान कृत्रिम सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सावंगी मेघे रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहेत. मात्र मणक्यांमध्ये कृत्रिम डिस्क प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया या रुग्णालयात प्रथमच करण्यात आल्याचे डॉ. सोहेल खान यांनी सांगितले. डिस्क बदलाच्या या प्रत्यारोपणामुळे मणक्यांची लवचिकता आणि गतिशीलता कायम राहणार असून अंतर्गत झीज होण्याचा धोकाही कमी झाला आहे आणि रुग्ण चालण्याफिरण्यास सक्षम होऊन त्याचे दैनंदिन जीवन सर्वसामान्यांसारखे पूर्ववत झाले असल्याचेही डॉ. खान यांनी सांगितले.