मुंबई- कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये लागलेल्या आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण बचावण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन शिंदे यांचा मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सोमवारी गौरव केला.
कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनंतर सुदर्शन शिंदे नागरिकांच्या बचावासाठी धावले होते. अनेक जणांना त्यांनी खांद्यावर टाकून बाहेर आणलं, तर जखमींना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर्सचीही सोय केली. सुदर्शन शिंदे यांनी आगीत अडकलेल्या नऊ नागरिकांचे प्राण वाचवले.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पहिल्या काही पोलिसांपैकी सुदर्शन शिंदे एक होते. घटनेच्या वेळी ते कमला मिल्स परिसरात ड्युटीवर होते. सुदर्शन शिंदे यांच्या या धाडसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
‘मी फायर ब्रिगेडचे जवान पोहचण्याची वाट पाहत होतो. तेव्हा मोबाइल फोनचे टॉर्च सुरु करुन आपण अडकलो असल्याची माहिती देणारे अनेक जण मला दिसले. तितक्यातच अग्निशमन दल घटनास्थळी आलं आणि मी त्या जवानांसोबत पबमध्ये मदतीसाठी धावलो.’ असं सुदर्शन शिंदेंनी सांगितलं
आपण अग्निशमन दलाच्या जवानांसोबत ज्यावेळी रुफटॉप पबमध्ये पोहचलो, तेव्हा चौथ्या मजल्यावरील टेरेसचा दरवाजा बंद (लॉक) होता. जवानांनी दरवाजा तोडला आणि सगळे जण आत शिरलो, असं शिंदे म्हणाले. त्यानंतर वरळी पोलिस स्थानकातील आणखी दोन कॉन्स्टेबल आमच्या मदतीला आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्ही तिघं आगीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करत होतो, असं शिंदेंनी सांगितलं.