नागपूर : भाजपचे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये प्रलंबित फौजदारी खटल्याची माहिती लपवली असल्याचे एका स्थानिक मराठी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीनुसार समोर आले आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. १४०/१७ अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि कट रचल्याचे आरोप असलेल्या प्रकरणाची नोंद असूनही, याबाबतची माहिती त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये समाविष्ट केली नाही, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर घाडगे यांनी केला आहे.
घोटाळ्याचा तपशील
जानकीनगर येथे देवनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या प्लॉट क्रमांक २०१ (एफ) व २०१ (ई) बाबत कोहळे यांनी कथितपणे बनावट कागदपत्रांच्या आधारे मोकळी जागा मिळवली. त्यांनी ही मोकळी जागा आणि प्लॉट्स एकत्र करून ३२०० स्क्वेअर फुटांचा भूखंड असल्याचे भासवले आणि तो त्यांच्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे.
फसवणुकीसंदर्भात पोलिस कारवाई
हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान तीन आरोपींनी हायकोर्टातून जामीन मिळवला आहे, तर कोहळे यांच्यावर अद्याप न्यायालयात हजर न होण्याचा आरोप आहे.
शाळा अन्यत्र हलवण्याचा निर्णय
जानकीनगर येथील मोकळ्या जागेवरील मनपाची शाळा हटवून कोहळे यांनी ती जागा मिळवण्यासाठी आपला राजकीय व प्रशासकीय दबाव वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.