नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाची बैठक बुधवारी (ता.२९) पार पडली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे बैठकीचे संयोजक होते. बैठकीत स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाचे सदस्य विदर्भ टॅक्स पेयर्स संघटनाचे सचिव श्री. तेजिंदर सिंग रेणू, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे श्री. कौस्तभ चॅटर्जी, सिविल लाइन्स रेसिडेंट असोसिएशन ची श्रीमती अनुसया काळे छाबरानी, सेन्टर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ची श्रीमती लीना बुधे, व्ही एन आय टी कॉलेज च्या इन्फ्रा विभागाचे डीन प्रो. प्रशांत डायगवाणे, स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिव श्रीमती भानुप्रिया ठाकूर, ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले, पर्यावरण विभागाच्या महाव्यस्थापक श्रीमती प्रणिता उमरेडकर, मुख्य नियोजन अधिकारी श्री. राहुल पांडे उपस्थित होते.
श्री. चिन्मय गोतमारे यांनी बैठकीत उपस्थित मान्यवरांना नागपूर स्मार्ट सिटी तर्फे पेन सिटी आणि ए.बी.डी. क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयीसाठी स्मार्ट सिटीतर्फे ५० विविध जागांवर महिला आणि पुरुषांसाठी १०० युनिट्स ई-टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेले ई-टॉयलेट्स नागरिकांच्या सुविधेसाठी बाजारपेठेत उभारण्यात येतील. तसेच स्मार्ट सिटीतर्फे अनाज बाजार इतवारी, गोकुळपेठ मार्केट, गांधीसागर तलाव आणि सीताबर्डी येथे मल्टीलेव्हल कार पार्कींगची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल. ही पार्किंग मेरि गो राऊंड सारखी असणार आहे आणि ५०० पेक्षा जास्त दुचाकी वाहन आणि चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था येथे करण्यात येईल.
श्री गोतमारे यांनी सांगितले कि नागपूरमध्ये सिवरलाईनच्या स्वच्छतेसाठी तीन रोबोटची खरेदी करण्यात येईल. या रोबोटच्या सहकार्याने छोट्या रस्त्यावरील आणि गल्लीतील सिवरलाईन ची सफाई योग्य प्रमाणे होऊ शकेल. सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सिवर लाईन स्वच्छता करतांना त्रास होतो आणि केंद्र शासनाने मानवाद्वारे सिवरलाईनच्या स्वच्छतेवर बंदी घातली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना या कामात त्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी रोबोट खरेदी करण्याचा महत्वाचा निर्णय स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले कि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी ४० मिडी ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही लहान मिडी बस वातानुकूलित असणार असून शहरातील गल्ली कोपऱ्या पर्यंत जातील. तसेच नॉन मोटोराईज्ड (motorized) ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ७५ ठिकाणी सायकल स्टॅन्ड लावण्यात येतील.
याशिवाय नागपूर शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करण्यासाठी आय.सी.टी. आधारित ४०० स्मार्ट कचरा कुंड्या २०० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. कचऱ्या कुंडी मध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या टाकण्याची सुविधा राहणार आहे तसेच कचरा कुंडी भरल्यावर याची सूचना श्रद्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मध्ये नोंद केली जाईल आणि कचरा उचलला जाईल.
महाराष्ट्र राज्य हमी कायद्यामध्ये नागरिकांना ४९ सेवेची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी मोबाईल ॲप तयार करणार असून सदर ॲप महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलला सुद्धा जोडले जाईल. नागरिकांना त्यांच्या मोबाईलच्या एक क्लिक वर माहिती प्राप्त करून घेता येईल.
त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या तीन वाचनालयांना स्मार्ट ई-लायब्ररी मध्ये परिवर्तित करण्यात येईल. शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि मोठी सुविधा असणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग , बँकिंग आणि याप्रकारची अन्य परीक्षेसाठी त्यांना इंटरनेटची सुविधा आणि संगणक उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मनपाच्या सहा शाळांना स्मार्ट शाळा करण्याचा निर्णयाची माहिती बैठकीत देण्यात आली.
नागपूर शहरातील पावसाळी नाल्या आणि सिवरलाईनचे जी.आय.एस. मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नागपूर शहरातील पावसाळी नाल्या आणि सिवरलाईनचा आराखडा मनपाकडे नाही. स्मार्ट सिटीतर्फे ही व्यवस्था नागपूरच्या नागरिकांसाठी महत्वाची ठरणार आहे.
याशिवाय शहरात स्मार्ट वाहतुकीची सुविधा देण्यासाठी ३३ चौकांमध्ये कॅन्टिलिव्हर पोल्सवर वाहतूक सिग्नल लावण्याचे निर्णयाची माहिती बैठकीत देण्यात आली. नागपूर विमानतळापासून संविधान चौक आणि एल.आय.सी. चौक ते पारडी पर्यंत मेट्रो रेल्वेच्या खाली वाहनचालकांसाठी कॅन्टिलिव्हर लावण्यात येतील. सध्याचे वाहतूक सिग्नल वाहनचालकांना स्पष्टरित्या दिसून येत नाही. कॅन्टिलिव्हरवर वाहतूक सिग्नल लावण्याने वाहनचालकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
स्मार्ट सिटीतर्फे करण्यात येणाऱ्या कामाची प्रसंशा करताना स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाचे सदस्यांनी सांगितले की, नागपूर शहरातील नागरिकांसोबत चर्चा करून ई-टॉयलेट, सायकल स्टॅन्ड आणि कचरा कुंडी लावण्याचा निर्णय घ्यावा. त्यांनी महत्वाचे सल्ले बैठकीत दिले. श्री. गोतमारे यांनी या मुद्द्यांवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. स्मार्ट सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि आभार मानले.