नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेख तौसीफ शेख फैजान (२३, रा. शहंशाह चौक, मोठा ताजबाग) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मात्र अचानक कर्मचाऱ्यांचे लक्ष गेल्याने त्याचा जीव वाचला.
माहितीनुसार, शेख तौसीफने विशिष्ट समूदायाशी संबंधित असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तौसीफने तिला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले. गेल्या आठवड्यात मंदिरात दर्शनासाठी आईवडिल गेल्यानंतर तौसीफने तिला घरातून पळवून नेले. तसेच जबरीने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत २१ जानेवारीला आरोपीला अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
तौसीफ सोमवारी रात्री साडेआठ वाजतापासून ब्लँकेटची दोरी तयार करीत होता. रात्री नऊ वाजता त्याने पोलीस ठाण्याच्या कोठडीच्या लोखंडी सळाखीला दोर बांधून गळफास घेतला. काही वेळाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे लक्ष कोठडीकडे गेल्यामुळे प्रकार लक्षात आला. पोलिसांनी धावपळ करीत कोठडीचे कुलूप उघडले आणि त्याचा गळफास सोडविला.
तौसीफ कोठडीतच बेशुद्ध पडल्यानंतर त्याला लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी आरोपी तौसीफवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.