नागपूर : बदनामीच्या भीतीने युवकाने कन्हान नदीच्या पात्रावरून फेसबुक ‘लाईव्ह’ करीत नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रेयसी आणि तिच्या आईवडिलांनी युवकाला बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात येत होती. या जाचाला कंटाळून तरुणाने रविवारी सायंकाळी पाच वाजता आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. मनीष ऊर्फ राज रामपाल यादव (३५, मिनीमातानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार, मनीष यादव हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. त्याचे इलेक्ट्रिकल्स साहित्याचे दुकान आहे. मनीषची वस्तीत राहणाऱ्या काजल नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंधांत होता. तिच्या आईवडिलांनाही मनीषबाबत माहिती होते.
काजल, तिचे आईवडील आणि एक छायाचित्रकार रमेश या चौघांनी कट रचून मनीष यादवला पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास काजलवर बलात्कार केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे मनीष खूप तणावात होता. शेवटी मनीषने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
रविवारी मनीष कन्हान नदीवर जाऊन फेसबुक लाईव्हवर आपबिती कथन केली. त्यात काजल, तिचे आईवडील आणि रमेशने केलेल्या ५ लाखांच्या खंडणीची माहिती दिली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी धमकी दिली. त्यामुळे नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे. चौघांनाही फाशीची शिक्षा व्हावी, असेही त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे.