Published On : Mon, Feb 19th, 2018

आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनात आत्महत्या

Advertisement

नागपूर : बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

दिलीप मंठूजी लोही (५२, रा. लक्ष्मीनगर, काटोल) असे मृताचे नाव आहे. दिलीप लोही हे मूळचे कोहळी (ता. कळमेश्वर) येथील रहिवासी असून, त्यांची सासूरवाडी लाडगाव (ता. काटोल) असल्याने ते कुटुंबीयांसह काटोल येथे राहायला आले. त्यांनी काही दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम केले. कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांनी आॅटो खरेदी केला होता. आॅटो चालवून ते उपजीविका करायचे. शिवाय, ते ठेका किंवा बटईने शेती करायचे. यावर्षी त्यांनी जितेंद्र वंजारी यांची शेती बटईने केली होती. त्यांनी चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र, संपूर्ण कपाशी बोंडअळीने फस्त केली. शिवाय, गहू व हरभरा गारपिटीने उद्ध्वस्त झाला.

पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्यता मावळल्याने ते चिंतेत होते. ते रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर पडले. मात्र, रात्रभर घरी परतले नव्हते. सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भाजपचे विजय महाजन उपोषण मंडपात आले. त्यांनी दिलीप लोही हे मंडपाच्या मागच्या बाजूला पडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शेजारी मोटो नामक कीटकशानकाची बाटली पडली होती. त्यांनी लोही यांचे नातेवाईक विनायक मानकर व ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांना कळविले. शिवाय, लगेच स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यापश्चात पत्नी व मुलगा आहे.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement