Published On : Tue, Dec 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सुमतीताईंचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी

Advertisement

नागपूर – पक्ष, संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. पक्षाला मान-सन्मान नव्हता. मान्यता नव्हती. पक्षाचे काम जवळपास संपुष्टात आले होते. पण राष्ट्राच्या पुनर्निमाणाचा विचार सुमतीताईंनी संघर्षातून पुढे नेला. ताईंचे संघर्षमय जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी लोकमाता सुमतीताई सुकळीकर यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

नागपूरच्या सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व जनसंघाच्या तत्कालीन आघाडीच्या नेत्या स्व. सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ मंगळवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. श्री. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसच समितीचे संयोजक प्रा. अनिल सोले, माजी न्यायाधीश मीराताई खडक्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार अरुण अडसड यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. ‘खेल खिलाडी खेल’चे संपादक संजय लोखंडे यांनी ताईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपादित केलेल्या ‘निष्ठा तुझे नाव ताई’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी झाले.

Advertisement
Tuesday Rate
Sat 24 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समाजातील शोषित पीडित माणसाचे जीवन बदलण्याचा पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांवर त्यांनी कार्य केले. सुमतीताई व त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आयुष्यभर संघर्ष सोसला म्हणून आज आपल्या पक्षाला चांगले दिवस आले आहेत. आज आपल्या पक्षाला, विचाराला जागतिक मान्यता मिळाली आहे. त्याचे श्रेय जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना आहे. मात्र, हे यश सहज प्राप्त झालेले नाही, याची जाणीव नवीन पिढीतील कार्यकर्त्यांनी ठेवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.

१९७७ मध्ये जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवली गेली, तेव्हा अर्ध्या नागपुरात रिक्षावर अनाऊन्समेंट करायला मी फिरलो. रिक्षावर फिरायला अनेक लोक तयार व्हायचे नाहीत. कारण पार्टीचा रिक्षा दिसला की लोक दगड मारायचे आणि पोस्टर फाडून टाकायचे. त्यावेळी जनसंघाबद्दल अपप्रचार झाला होता. त्यामुळे लोक आदर करायचे नाही. त्या प्रतिकूल परिस्थितीतही सुमतीताई झोपडपट्टीत जाऊन लोकांची सेवा करायच्या. आज पक्षाचा आमदार निवडून येणे सोपे आहे. मात्र आम्ही सर्वांनी प्रयत्न करूनही ताईंनी निवडून आणून देऊ शकलो नाही याची खंत आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

सुमतीताईंसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील खूप संघर्ष केला. ताईंनी प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम केले. या संघर्षाचा खूप मोठा इतिहास आहे. नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा हा संघर्ष आहे. तेव्हाच्या संघर्षामुळे आम्हाला आज मान-सन्मान मिळतोय, याची कायम जाणीव आहे, असेही ते म्हणाले.

युद्धभूमी सोडली नाही

सुमतीताई प्रत्येकवेळी निवडणूक हरायच्या आणि पुन्हा जिद्दीने कामाला लागायच्या. माझ्या आईला वाईट वाटायचं. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढू नका, असे ती सुमतीताईंना म्हणाली. पण ताई लढत राहिल्या. संघर्ष करत राहिल्या. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक वाक्य आहे : ‘मॅन इज नॉट फिनिश्ड व्हेन ही इज डिफिटेड; बट ही इज फिनिश्ड, व्हेन ही क्विट्स’. ‘युद्धभूमीवर हरल्यामुळे कुणीही समाप्त होत नाही, पण युद्ध हरल्यानंतर युद्धभूमी सोडणारा समाप्त होतो.’ ताईंच्या जिद्दीमागे असाच विचार होता, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

सुमतीताईंच्या सहकाऱ्यांचा गौरव

जनसंघाच्या काळात सुमतीताई सुकळीकर यांच्यासोबत विविध आंदोलनात भाग घेणारे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते योगानंद काळे, सुधाताई सोहोनी, शोभाताई फडणवीस, आनंदराव ठवरे, सविताताई काळे, मालतीताई बढिये, उमाताई पिंपळकर, नंदिनीताई हलकंदर, निर्मलाताई चितळे, रमेश दलाल, शशीताई जोशी, मालाताई केकतपुरे, दारुराम देवांगण, मामा पांढरीपांडे, मोरुभाऊ बरडे, अब्दुल लतीफ बाबा, विजय केवलरामानी यांचा ना. श्री. गडकरी व ना. श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सुमतीताईंनी पक्षाचा दिवा घरोघरी नेला – मुख्यमंत्री श्री. फडणवीस

जनसंघाचा दिवा घेऊन सुमतीताई जनमानसात सातत्याने गेल्या. त्यांनी पक्षाचे कार्य मोठे केले. भारतीय जनसंघाची खरी ताकत मातृशक्ती होती, असे म्हटले जायचे. सुमतीताई चारवेळा निवडणूक लढल्या. पक्ष मोठा झाला पाहिजे आणि पक्ष घरोघरी पोहोचला पाहिजे, या उद्देशाने लढल्या. निवडणूक हरल्या तरीही मनाने कधी हरल्या नाहीत. प्रत्येकवेळी तेवढ्याच ताकदीने उभ्या व्हायच्या. सातत्याने कार्य केले. पोलिसांशी संघर्ष केला. नेता म्हणून जशा कणखर होत्या, तेवढ्याच त्या कार्यकर्त्यांसाठी मातृतुल्य होत्या. भारतीय जनसंघाचे कुटुंब त्यांनी उभे केले, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमतीताई सुकळीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Advertisement