Advertisement
नागपूर : गिट्टीखदान भागातील गँगस्टर सुमित ठाकूर याला बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याच्या घरातून अटक केली. आरोपी ठाकूर याने त्याच्या टोळीसह जरीपटका परिसरातील थावरे कॉलनी येथील तीन मित्रांचे बंधुकीच्या धाकावर अपहरण केले होते. सुमितच्या तावडीतून सुटल्यानंतर या तिघांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर गुंड सुमित ठाकूर फरार झाला होता. आरोपी सुमित ठाकूर बुधवारी गिट्टीखदान परिसरातील घरात आल्याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घेराव घालून त्याला अटक केली.
पोलिसांशी लपाछपीचा खेळ-
गुन्हे शाखा पोलिस विभागातील पथकाचे एपीआय मयूर चौरसिया आणि सहकाऱ्यांना सुमित ठाकूर हा त्याच्या घरी पोहोचल्याची गुप्त माहिती मिळाली. या पथकाने युनिट 2 च्या पथकाला यासंदर्भात माहिती दिली. या पथकाने सुमित ठाकूरला त्याच्या घरातून पकडले. ऑक्टोबर 2023 पासून सुमित ठाकूर पोलिसांसोबत लपाछपीचा खेळ खेळत होता. तो मध्य प्रदेशात पळून गेला होता. सुमित ठाकूरची नागपुरात मोठी टोळी असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जरीपटका येथील ठवरे कॉलनीत सुमित ठाकूर याने आपल्या मैत्रिणीसोबत दहशत निर्माण केली होती. त्याने त्याच्या टोळीसह रिपब्लिकन नगर न्यू इंदोरा येथील रहिवासी कमल नाईक, त्याचे मित्र मुझफ्फर शेख आणि अतुल आत्राम यांचे त्यांच्या कारमधून बंदुकीच्या धाकावर अपहरण केले होते.
जरीपटका पोलिसांनी घेतले ताब्यात –
सुमित ठाकूर याने गिट्टीखदान परिसरातील एका गोदामात तिन्ही मित्रांना ओलीस ठेवून पिस्तुलाने गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. कमल आणि त्याचे दोन मित्र सम्राट गोंडाणे यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते, रात्रीचे जेवण करून ते रस्त्याच्या कडेला उभे होते, याचवेळी सुमित आपल्या महिला मैत्रिणीसोबत लाल रंगाच्या गाडीतून भरधाव गाडी चालवत त्या ठिकाणी आला. त्या तीन मित्रांनी त्याला गाडी नीट चालवण्याचा सल्ला दिला होता. याचाच राग सुमितला आला. यादरम्यान त्यांच्यात बाचाबाची झाली, त्यानंतर आपल्या महिला मित्राला घरी सोडल्यानंतर सुमितने टोळीसह त्या तिघांचे अपहरण केले. बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपी सुमित ठाकूरला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.