नागपूर : सर्वात मोठा परिसर लाभलेल्या शहरातील जयताळा स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी मूलभूत सुविधांना अभाव असल्याने नागरिकांना अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रशासनानेही याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. मात्र येथील स्थानिकांनी एकजूट होत समाजाला काही तरी देणे आहे, या उद्देशाने एक संस्था तयार केली. ‘दीपस्तंभ’ असे या संस्थेचे नाव असून यामाध्यमातून जयताळा स्मशानभूमीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
गेल्या १० वर्षपासून स्मशानभूमी ही स्वयंसेवी संस्था नि:शुल्क सेवा देत आहे. ‘दीपस्तंभ’ संस्थेच्या माध्यमातून दररोज स्मशानभूमी परिसरात स्वच्छता करण्यात येते. संस्थेतील जवळपास २० ते ३० लोक याकरिता झटत असतात. अगदी लहानापासून ते जेष्ठांपर्यंतचा यात सहभाग असतो. नुकताच १० मे रोजी ‘दीपस्तंभ’ परिवाराचे सदस्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामेश्वर नितनवरे यांनी त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने स्थानिक नागरिकांसोबत घाटात श्रमदान आणि वृक्षारोपण केले. इतकेच नाही कोरोनाच्या काळातच याठिकाणी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते.
संस्थेच्यावतीने याठिकाणी लवकरच लोकांच्या सेवेसाठी नवीन शववाहिका खरेदी करण्यात येणार आहे. जयताळा घाट हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात येत असून नागरिकांना याठिकाणी मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी दीपस्तंभ परिवार सामाजिक संस्थेकडून उपमुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे.
जयताळा स्मशानभूमीत मोठ्या सोयी -सुविधांचा आभाव असून त्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच आर्थिक पाठबळ मिळावे जेणेकरून स्मशानभूमीचा विकास होईल, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नंदू मानकर, जयंतराव गुडधे पाटील, देवराव पांडे, रिखिराम विजयवार, विनोद भेले, प्रमोद संतापे, वीरेंद्र चिमोटे, दीपक महानाईक, रितेश शेंडे, वर्षा मानकर, विशाखा भेले, संगीता पानसे, रंजिता रामटेके, विनोद मेहरे, रामेश्वरजी नितनवरे, विनोद भेले, गजानन मुंजे आदींनी केली.
सामाजिक भावनेच्या उद्देशाने काम केल्यास ते काम उत्तम होतेच. समाजऋणाची ही भावना सर्वच समाजाच्या लोकांनी बाळगावी. स्मशानभूमी हे अंतिम मुक्कामाचे ठिकाण आहे. त्याची देखभाल करणे मोठे पुण्य आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामेश्वर नितनवरे यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना दिली .