नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. न्यायालयाने नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सुनील केदार यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलवर निर्णय करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहे. केदार यांचे वकील सुप्रीम कोर्टात उपस्थित नसल्याने हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले होते. त्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या विनंतीवरून हे प्रकरण पुढे ढकलले आहे. मात्र त्यात सुनील केदार यांना कुठेही दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने झटका दिला होता. यावेळी नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे सुनील केदार हे आमदार म्हणून अपात्रच राहतील, असा निर्णय देण्यात आला होता. त्यांनंतर स्वतः ला मिळालेली शिक्षा स्थगित करून घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.